विशेष
वालचंदनगर येथील कृषी सेवा केंद्राचा परवाना कृषी विभागाकडून निलंबित.
इंदापुरात कृषी विभागाची कडक कारवाई.

इंदापूर,दि.२४
- इंदापूर तालुक्यातील वालचंदनगर येथील मे बाहुबली शांतीलाल दोभाडा या कृषी सेवा केंद्राचा परवाना १० दिवसांसाठी निलंबित करून कृषी विभागाने धडक कारवाई केलेली आहे. तसा आदेश परवाना अधिकारी तथा जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी संजय काचोळे यांनी दिला आहे.
वालचंदनगर येथील मे बाहुबली शांतीलाल दोभाडा या दुकानाविरुद्ध शेतकऱ्यांकडून ज्यादा दराने खत विक्री करत असल्याबाबत तक्रारी कृषी विभागाला प्राप्त झाल्या होत्या. त्याची दखल घेत गुण नियंत्रण निरीक्षक इंदापूर योगेश फडतरे यांनी कृषी सेवा केंद्राची तपासणी केली असता, खताची ज्यादा दराने विक्री,शेतकऱ्यांना अरेरावीची भाषा, साठा फलक, भाव फलक न लावणे इत्यादी गंभीर त्रुटी आढळून आल्या.त्यानुसार कृषी विभागाने आदेश काढत या कृषी सेवा केंद्राची निलंबन केले आहे.
इंदापूर तालुक्यातील सर्व कृषी सेवा केंद्र चालकांनी कायद्यातील नियमानुसार खते, बियाणे व कीटकनाशके यांची विक्री करावी. शेतकऱ्यांची अडवणूक करू नये, अन्यथा कठोर कारवाई केली जाईल असा इशारा कृषी विभागाने दिला आहे.



