- इंदापूर,दि.६
- उजनी धरण १०७.४० टक्के भरले असून आता धरणातून भीमा नदी, कालवा, उपसा सिंचन योजनांमधून पाणी सोडण्यात आले आहे. रविवारी सायंकाळी पाचच्या सुमारास धरणातून भीमेत १२५००० हजार क्युसेस,सीना-माढा उपसा १०५ क्युसेस,दहिगाव उपसा १०० क्युसेस,बोगदा ९०० क्युसेस, कॅनाल २०० क्युसेस,पावर हाऊस १६०० असे एकूण १२६६०० क्युसेस ने विसर्ग सोडण्यात आला.
वीरमधूननही ५० हजार क्युसेकचा विसर्ग सोडण्यात आल्याने पंढरपूरपासून पुढे पूरस्थिती निर्माण होवू शकते. या पार्श्वभूमीवर नदीकाठच्या लोकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
जिल्ह्याची वरदायिनी उजनी धरण पुण्यातील पावसामुळे १०७.४० टक्के भरले आहे. धरणात १०७.४० टक्के पाणी ठेवून वरून येणारा विसर्ग आहे तसाच भीमा नदीतून खाली सोडण्यात येत आहे. सध्या उजनी धरणात दौंडवरून १६७६०१ क्युसेकचा विसर्ग जमा होत आहे. धरणात ११७.२८ टीएमसी पाणी मावते, त्यात ५३.५७ टीएमसी उपयुक्त तर ६३.६६ टीएमसी मृतसाठा आहे. पावसाळा अजून दोन महिने शिल्लक असल्याने आता धरणात १०७ टीएमसीपर्यंत पाणी ठेवून उर्वरित पाणी नदी, कॅनॉल, उपसा सिंचन योजनांमधून सोडून दिले जाणार आहे. दुसरीकडे वीर धरणातूनही पाणी सोडण्यात आल्याने भीमा नदीला पूर येवू शकतो, अशी स्थिती आहे. नदी काठावरील लोकांना सुरक्षित ठिकाणी नेण्यासाठी जिल्हा प्रशासनाचा प्रयत्न सुरू आहे.
वीर धरणातून ५० हजार क्युसेकचा विसर्ग भीमा नदीत सोडण्यात आला असून आता उजनी धरणातून सोडलेला विसर्ग देखील ५० हजारांपर्यंत केला जाणार आहे. पंढरपूर परिसरातील भीमा नदीच्या पात्रात एक लाख २० हजार क्युसेकपर्यंत विसर्ग मावतो. पण, त्याहून जास्त विसर्ग वाढल्यास भीमा नदी काठावरील १०५ गावांना धोका होवू शकतो. त्या सर्वांनाच ग्रामसुरक्षा समित्यांच्या माध्यमातून सकर्त राहण्याचा इशारा दिला आहे.
पूरग्रस्त लोकांना मदतीसाठी ‘हा’ क्रमांक
१८००२७०३६०० ग्रामसुरक्षा समिती यंत्रणेचा क्रमांक आहे. पोलिस पाटील, कोतवाल, ग्रामपंचायत, पोलिस ठाणे, तहसीलदार यांच्याशी सपंर्क साधता येईल. गरजेच्यावेळी सातारा, पुणे या जिल्ह्यातून ‘एनडीआरएफ’चे पथक बोलविण्याचीही तयारी जिल्हा प्रशासनाची आहे. २०२० नंतर जिल्ह्यात पूरस्थिती निर्माण झाली नाही, पण संभाव्य स्थितीचा अंदाज घेऊन जिल्हा आपत्ती नियंत्रण कक्ष अद्ययावत केला जात आहे.