वाढत्या वयाने मुला-मुलींची लग्न जुळेना;आई-वडिलांच्या अपेक्षा सुटेना.?
मुला-मुलींसोबत त्यांच्या कुटुंबाची एकत्रित चर्चा होण्याची काळाची गरज.
![](https://batmichebola.com/wp-content/uploads/2025/02/IMG_20250204_081614-780x470.jpg)
जितेंद्र जाधव (पत्रकार) – इंदापूर
- सध्या ज्याप्रकारे सुशिक्षित बेरोजगारांचे प्रमाण झपाट्याने वाढू लागले आहे. त्याचप्रमाणे प्रत्येक समाजामध्ये विवाह अथवा लग्न न होणाऱ्या मुला-मुलींचे हे प्रमाण झपाट्याने वाढत आहे. यामुळे सामाजिक समतोल ढासळून वय वाढत असताना मुला-मुलींच्या आई-वडिलांच्या अपेक्षा कमी होत नसल्यामुळे विवाह जमत नसल्याने अनेक तरुण-तरुणी नैराश्यातून आत्महतेकडे प्रवृत्त होत असल्याचे दिसत आहे. ही समस्या येणाऱ्या वर्तमान काळात अधिक गंभीर स्वरूपाचे रूप धारण करून कुटुंब व्यवस्था उध्वस्त करू शकते.
तरुण-तरुणीचे लग्न किंवा विवाह हे दोन कुटुंबातील एकमेकांमध्ये होणारे ऋणानुबंध अथवा सामाजिक बंधन नसून ते समाज व्यवस्था व कुटुंब व्यवस्था टिकवण्यासाठी महत्त्वाचे पाऊल असते. मात्र या सर्वांना सध्याच्या घडीला फार मोठी अडचण निर्माण झाली आहे. कारण कुटुंब व्यवस्था कायम अबाधित राहण्यासाठी विवाहास योग्य असलेल्या मुला-मुलींचे वेळेवरती लग्न होणे फार गरजेचे असते. परंतु,सध्या तसे होताना दिसत नाही. कारण मुला मुलींचे वय झपाट्याने वाढू लागले आहे. वाढत्या वयात आपल्या मुला- मुलींचे लग्न वेळेत होणे गरजेचे असताना कुटुंबातील पालकांच्या मात्र अपेक्षा अधिक वाढू लागल्या आहेत. या वाढत्या अपेक्षा मुळे लग्नाचे वय होऊन गेल्याचे पालकांसहीत मुला-मुलींना कळत नसल्याने वाढत्या वयानंतर गोंधळ निर्माण होऊन विवाह विलंब होत आहे. या विलंबामुळे योग्य वेळेत लग्न न झाल्याने त्या तरुण-तरुणींना अनेक संकटांना सामोरे जावे लागत आहेत.
दिवसेंदिवस काळ बदलत चालला आहे. समाजा समाजामध्ये चौकसपणा वाढला आहे. माणसं अधिक गतीने दर्जेदार शिक्षण घेत आहेत. या तंत्रज्ञानाच्या युगात मुला-मुलींचेही अधिक गतीने उत्तम दर्जाचे शिक्षण झाले आहे. प्रत्येक जण करिअरचा विचार करून उत्पन्न व शिक्षण या दोन्हीची सांगड घालत पालकांच्या व नातलगांच्या मदतीने विवाह ठरवू लागले आहेत. या सर्व गोष्टी सुरू असताना मुला-मुलींचे वय तितक्यात झपाट्याने वाढू लागले आहे. या वाढत्या वयात मुला मुलींचे रूपांतर प्रौढात होत लग्नाचे वय व शरीराची अवस्था बदलत चालली आहे. या सर्व गोष्टींमुळे अनेकांना आपले लग्न होईल की नाही याबाबत शंका निर्माण झाली असून बऱ्याचशा तरुण-तरुणीने लग्नाची आशा सोडून दिल्याचे दिसत आहे. या सर्व गोष्टींकडे पालकांनी तात्काळ लक्ष देणे गरजेचे झाले आहे.
या सर्व गंभीर गोष्टीकडे समाजातील प्रमुख व्यक्तींनी व सुशिक्षित लोकांनी लक्ष देणे गरजेचे आहे. कारण समाजातील या वाढत चाललेल्या गंभीर समस्येला जबाबदार कोण असा प्रश्न निर्माण झाला आहे..? हा गंभीर होत असलेला प्रश्न तात्काळ सोडवण्यासाठी समाजातील अनेक जण रात्रंदिवस प्रयत्नांची पराकाष्ठा करत आहे. मात्र त्यांना ही समस्या सध्या तरी सुटताना दिसत नाही. त्यामुळे या समस्येवरती दोन्ही कुटुंबामध्ये सखोल चर्चा व संवाद होणे गरजेचे असून विवाह योग्य असलेल्या मुला-मुलींचे पालक व वय वाढत चाललेले तरुण-तरुणी यांनी स्वतः आत्मपरीक्षण करणे गरजेचे आहे. अन्यथा भविष्यात एक सामाजिक बंधन असलेली कुटुंब व्यवस्था उध्वस्त होऊ शकते.
पालकांच्या वाढत्या अपेक्षा विवाह जुळण्यास अडसर..?
सध्या समाजामध्ये मुलींच्या पालकांच्या अपेक्षा प्रचंड वाढल्या आहेत. मुलगा देखणा असावा, उच्चशिक्षित असावा, सरकारी नोकरदार असावा, घरी गाडी व बंगला असावा, तो एकुलता एक असेल तर योग्य अन्यथा त्याचे स्वतःचे वेगळे घर अथवा फ्लॅट असावा, मुलाला शेती असावी, तो ठराविक भागात अथवा शहरात राहणारा असावा अशा अपेक्षा वाढल्या असून आई-वडिलांव्यतिरिक्त नातेवाईकांमध्ये अनेकांना विचारत खूप चौकशी,पाहणी करण्यातच वेळ वाया जाऊ लागला आहे. त्यामुळे अनेक मुला-मुलींचे पालक स्थळ सुचवल्यानंतर त्याला उशिरा प्रतिसाद देत असल्याने व अत्यंत किरकोळ गोष्टीवरून या अटी आणि शर्तीच्या कैचीतून लग्न जमवण्यास नकार दिला जात आहे.