नीरा भीमा कारखाना आर्थिक अडचणीतून आता सुस्थितीत – हर्षवर्धन पाटील.
नीरा-भीमा कारखान्याला पुन्हा चांगले दिवस.
इंदापूर,दि.२३
- निरा-भिमा सहकारी साखर कारखान्याचा आर्थिक अडचणीचा काळ आता संपलेला असून, कारखाना आर्थिक दृष्ट्या सुस्थितीमध्ये आला आहे. कारखाना आर्थिक संकटातून बाहेर आल्याने आगामी काळात निरा भिमाचा समावेश राज्यातील टॉप १० कारखान्यामध्ये निश्चितपणे होईल, अशी स्पष्ट ग्वाही कारखान्याचे संस्थापक व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी दिली.
शहाजीनगर (ता.इंदापूर ) येथिल निरा भिमा सहकारी साखर कारखान्याची सन २०२३/२४ ची २६ वी वार्षिक सर्वसाधारण सभा कारखान्याच्या भाग्यरत्न सांस्कृतिक भवनमध्ये खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झाली. या सभेत सर्व विषयांना एकमताने मंजूरी देण्यात आली. या सभेच्या अध्यक्षस्थानी कारखान्याचे अध्यक्ष लालासाहेब पवार होते. याप्रसंगी मार्गदर्शन करताना हर्षवर्धन पाटील बोलत होते.
कारखान्याकडून शेतकऱ्यांची सर्व ऊस बिले वेळेत त्यांच्या खात्यामध्ये जमा केली आहेत. गत हंगामात कारखाना अतिशय चांगल्या पद्धतीने चालला असून शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे असे मत हर्षवर्धन पाटील यांनी व्यक्त केले.
शेतकऱ्यांचे हित डोळ्यासमोर ठेवून कारखान्याचे कामकाज केले जात आहे. कारखान्याची आजची रौप्यमहोत्सवी म्हणजे २६ वी वार्षिक सभा आहे. या २६ वर्षामध्ये कारखान्यास सहकार्य करणारे सभासद, शेतकरी बांधव, हितचिंतक या सर्वांचे मी प्रथम आभार व्यक्त करतो. भाऊंनी कारखाना स्थापन करण्याची सूचना केली व आपण त्यास आपण सर्वांनी मूर्त रूप दिले. भाऊंनी घालून दिलेल्या संस्कारानुसारच आपली सर्वांची वाटचाल सुरु आहे, असे त्यांनी सांगितले.
कारखान्याचा २६ वर्षांच्या इतिहास पाहिल्या तर अनेक अडचणीवर आल्या. मात्र या अडचणींवर यशस्वीपणे मात करीत लावलेल्या रोपट्याचे आज वटवृक्षात रूपांतर झाले आहे. या कारखान्यामुळे अनेक संसार उभे राहिले, प्रगती झाली, याचा आनंद होत आहे, असे हर्षवर्धन पाटील यांनी नमूद केले.
या सभेस विलासराव वाघमोडे, उदयसिंह पाटील, मयूरसिंह पाटील, राजवर्धन पाटील, अनिल पाटील, तानाजीराव हांगे, विकास पाटील, दत्तात्रय शिर्के, मनोज पाटील, किरण पाटील, दत्तू सवासे, हरिदास घोगरे, दादासो घोगरे, संजय बोडके, प्रकाश मोहिते, बबनराव देवकर, भागवत गोरे, चंद्रकांत भोसले, दत्तात्रय पोळ, कमाल जमादार व मान्यवर उपस्थित होते.