इंदापूर मध्ये डॉ दडस यांना तर माळवाडी ग्रुप ग्रामपंचायत मध्ये दोन कर्मचाऱ्यांना जबर मारहाण.
पुन्हा इंदापूर मध्ये कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर...?

इंदापूर/ प्रतिनिधी –
- इंदापूर शहरातील साईसेवा क्लिनिकमध्ये डॉ.प्रदीप दडस यांना लोखंडी स्टुल ने जबर मारहाण केल्याची घटना घडली असून या प्रकरणी तिघा जणांविरोधात तर माळवाडी ग्रुप ग्रामपंचायत मध्ये ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना गावातील गावगुंडाने मारहाण केल्या असून त्यामध्ये एक व्यक्तीच्या विरोधात इंदापूर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
इंदापूर शहारातील डॉक्टर संघटनेच्या वतीने डॉक्टर दडस यांना झालेल्या मारहाण या घटनेचा तीव्र निषेध व्यक्त करीत पोलिसांना निवेदन देत आरोपींवर कडक कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. तसेच माळवाडी ग्रुप ग्रामपंचायत मध्ये ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना झालेला मारहाण विरोधात ग्रामपंचायत कर्मचारी संघटनेच्या वतीने सदर मारहाण करणाऱ्या व्यक्तीच्या विरोधात कडक कारवाईची मागणी लेखी निवेदनाद्वारे करण्यात आले आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, इंदापूर शहरातील भार्गवराम बगीचा लगत असलेल्या जुन्या अकलूज मार्गावर डॉ.प्रदीप दडस यांचे साई सेवा क्लिनिक आहे.यामध्ये शनिवार (ता.१९) रोजी सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमारास नाना कोळेकर (रा तरंगावाडी, ता- इंदापूर), दयानंद रामचंद्र जाधव, रविंद्र भंडलकर (दोघे रा.कौठळी ता.इंदापूर) यांनी कंपाउंडर आणि डॉक्टर दडस यांचे भाऊ यांना मारहाण केली.तसेच डॉक्टर दडस यांच्या उजव्या हातावर लोखंडी स्टुलने वार करत गंभीर दुखापत करीत लाथाबुक्क्यांनीही मारहाण करण्यात आली. यावरून इंदापूर पोलीस स्टेशन येथे वरील तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान, गेल्या दोन-तीन दिवसांपूर्वी इंदापूर तालुक्यातील माळवाडी नं १ व माळवाडी नं २ या ग्रुप ग्रामपंचायत मध्ये काम करणाऱ्या दोन कर्मचाऱ्यांना गावातील दिपक महादेव रायकर,रा-माळवाडी नं १ या व्यक्तीने गलिच्छ शिवीगाळ करत मारहाण केल्याची तक्रार दाखल करण्यात आली आहे. सदरच्या गावगुंडाने काही महिन्यांपूर्वी ग्रामपंचायत मधील काम करणाऱ्या ग्रामसेवक असलेल्या महिलेला शिवीगाळ केल्याची सदर ग्रामसेवक असलेल्या महिलेने इंदापूर पोलीस स्टेशनमध्ये तक्रारी अर्ज दिला होता.
मात्र त्या व्यक्तीवर कोणतीही कारवाई करण्यात आली नाही अशी चर्चा माळवाडी गावामध्ये सुरू आहे. सदर गुंड प्रवृत्तीच्या व्यक्तीला तालुक्यातील बड्या नेत्याचा वरदहस्त असल्याचे चर्चा सुरू असून या गावगुंडाने गावात दादागिरी व दहशत निर्माण केली असून यावर पोलीस प्रशासनाचा कसलाही वचक राहिला नाही असे तक्रारदार यांचे म्हणणे आहे.
इंदापूर पोलिसांचा धाक राहिला नाही का…? नागरिकांकडून उलट प्रश्न..?
इंदापूर शहरातील डॉक्टरला झालेली मारहाण व माळवाडी ग्रामपंचायत मध्ये कर्मचाऱ्यांना झालेली मारहाण या दोन गंभीर घटना पाहता इंदापूर परिसरात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्याची चर्चा सुरू असून सदर दहशत निर्माण करणाऱ्या व मारहाण करणाऱ्या लोकांवरती पोलिसांचा धाक राहिला नसल्याने अशा घटना होत असल्याचे बोलले जात आहे.



