जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर यांना राज्यपाल नियुक्त विधान परिषदेची उमेदवारी देण्याची मागणी
इंदापूर,दि.६
- राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पुणे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर यांना राज्यपाल नियुक्त विधान परिषदेची उमेदवारी देण्यात यावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी उपमुख्यमंत्री उचित पवार यांची समक्ष भेट घेऊन केली. तसे निवेदन ही आ. दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते पवार यांना देण्यात आले.
प्रदीप गारटकर हे गेल्या ४२ वर्षांपासून सामाजिक, धार्मिक, अध्यात्मिक, सांस्कृतिक, आर्थिक, सहकार क्षेत्रात कार्यरत आहेत. कला क्रीडाक्षेत्र व विशेषतः दिव्यांग क्षेत्रात भरीव योगदान आहे. संघटन कौशल्यामुळे ते राज्यभर परिचित आहेत.गोरगरीब, उपेक्षित घटकांसाठी त्यांनी तब्बल ४२ वर्षे संघर्ष केला. सन १९८२ मध्ये पतित पावन संघटनेपासून त्यांच्या ४२ वर्षांच्या सार्वजनिक क्षेत्रातील कारकीर्दीचा प्रारंभ झाला.भाजप, शिवसेना व सन २००६ नंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षापर्यंत विविध माध्यमातून ते सार्वजनिक जीवनात कार्यरत आहेत.गेल्या १८ वर्षांपासून अजित पवार यांचे नेतृत्व स्वीकारून अत्यंत प्रभावीपणे पक्ष संघटन मजबूत करण्याचे काम ते करीत आहेत.
पुणे जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाची ताकद आहे. मागील विधानसभा निवडणूकीच्या वेळी ग्रामीण भागातून सात आमदार व एकाचे दोन खासदार करण्यासाठी प्रदीप गारटकर यांनी विशेष परिश्रम घेतले आहेत. पक्ष दुभंगल्यानंतर अजित पवार यांच्याकडे आलेल्या जिल्ह्यातील पदाधिकारी-कार्यकर्त्यांमध्ये प्रदीप गारटकर यांच्या इतका सामाजिक क्षेत्रात,राजकीय क्षेत्रात अनुभव असलेला व स्वतःचे कर्तृत असलेला कार्यकर्ता पाठीशी असणे निश्चितपणे भूषणावह असणार आहे. राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून देशाची जबाबदारी सांभाळत असताना, आपला स्वतःचा असणारा पुणे जिल्हा योग्य व विश्वासू कार्यकर्त्यांच्या हाती सोपवणे महत्वाचे व गरजेचे आहे.
गारटकर यांना राज्यपालनियुक्त विधानपरिषदेची संधी पक्षाने दिल्यास त्यांच्याबद्दल आपुलकी असणारे विविध क्षेत्रातील असंख्य लोक खुश होतीलच. त्यांचे विरोधकदेखील खुष होतील. संघटनेचे बळ निश्चित वाढेल अशी खात्री आम्हाला वाटते, असे अजित पवार यांना दिलेल्या निवेदनात कार्यकर्त्यांनी म्हटले आहे.