“दादांचा अर्थसंकल्प विकासाचा’, पुस्तक सोहळा, अजित पवार म्हणाले.
चांद्यापासून बांद्यापर्यंत शासकीय योजनांचा लाभ- उपमुख्यमंत्री अजित पवार.
पुणे,दि.१८
- महायुती सरकारमधील तिन्ही मित्र पक्ष सध्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा कसून प्रचार करीत आहे. विधानसभा निवडणूकीच्या तोंडावर आपापल्या परीने तिन्ही पक्षातील नेते वेगवेगळी रणनिती आखत आहेत.अशातच दादांचा अर्थसंकल्प विकासाचा या गौरवांकाच्या प्रकाशन सोहळा नुकताच पुण्यात पार पडला. यावेळी अजित पवार यांनी मोठं भाष्य केले आहे.
अजित पवार म्हणाले की, माझ्या आजवरच्या राजकीय कारकिर्दीत पुणे जिल्ह्यानं मला मोलाची साथ दिली. त्यामुळेच माझं राजकीय जीवन घडलं. त्याचप्रमाणे सर्वाधिक अर्थसंकल्प सादर करण्याचा मान मला मिळाला, याचा आनंद मोठा आहे. शेतकरी, महिला, कामगार-मजूर, युवक-युवती, वारकरी अशा पद्धतीनं सर्व समाज घटकाला यंदाच्या अर्थसंकल्पातून समान न्याय देण्याचा माझा सर्वोतोपरी प्रयत्न राहिला. ज्या कारखान्यांमध्ये आपली सत्ता आहे, त्या कारखान्यातील ऊसाला सर्वाधिक भाव आपण दिला.
जनसामान्यांच्या फायद्यासाठी राज्य सरकारनं अनेक योजना हाती घेतल्या आहेत. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून महाराष्ट्रभरातल्या मायमाऊलींच्या, भगिनींच्या बँक खात्यात पैसे जमा झाले आहेत. पिंक ई-रिक्षा योजनेचा लाभ माझ्या बहिणींना झाला आहे. शेतकरी बांधवांना वीज बिल माफी दिली आहे. दूध उत्पादक शेतकऱ्यांना प्रति लिटर मागे पाच रुपये अनुदान देऊ केलं आहे. अल्पभूधारक शेतकऱ्याला वर्षभरात ५० हजारांची मदत सरकारच्या वतीनं देऊ केली आहे.
गाईंच्या देशी ब्रीडसाठी प्रोत्साहन म्हणून सरकारनं निधी उपलब्ध करून दिला आहे. युवक युवतींना परदेशात नोकरीसाठीची विशेष तरतूद राज्य सरकारनं केली आहे. अर्थमंत्री म्हणून महाराष्ट्राला आर्थिक शिस्त लावण्याचा मी सर्वोतोपरी प्रयत्न केला आहे. चांद्यापासून बांद्यापर्यंत शासकीय योजनांचा लाभ पोहोचावा यासाठी कार्यतत्पर राहिलो आहे. असेही त्यांनी यावेळी म्हटलं.