……!!…यांची बनवाबनवी सुरू..
लाडकी बहीण योजनेचे पैसे जमा होताच बहिणीला गाडी पाठवून घरी बोलवले...?
इंदापूर,दि.१८
- राज्य सरकारने विधानसभेच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना राज्यामध्ये सुरू केली आहे. या योजनेत पात्र महिलांना दोन महिन्याचे योजनेचे पैसे खात्यात जमा होण्यास सुरुवात झाली आहे. सदर योजनेचे पैसे खात्यात जमा होताच पुणे जिल्ह्यातील नेत्यांनी बनवाबनवी सुरू केली असून या पात्र लाभार्थी बहिणींच्या योजनेचे श्रेय घेण्यासाठी सदर राजकीय बंधुरायाने चक्क गावोगावी गाड्या पाठवून सदरच्या लाभार्थी बहिणी घरी बोलून स्वतःचे औक्षण करून घेतल्याने सदर नेत्याने बनवाबनवी सुरू केल्याची चर्चा जोरात सुरू आहे.
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना राज्य सरकारची योजना असून आम्ही सत्तेमधील आहोत. त्यामुळे या योजनेचे श्रेय आम्हीच घेणार ही मनामध्ये राजकीय फायद्याची बाजू ज्वलंत करत पुणे जिल्ह्यातील एका नेत्याने आणि कार्यकर्त्यांना ज्या पात्र लाभार्थी महिला आहेत त्या महिला थेट आपल्या निवासस्थाने घेऊन या असे आदेश दिले. ज्या महिलांना येण्यासाठी स्वतःच्या गाड्या नाहीत अशा महिलांना आणण्यासाठी गाड्या देऊन त्या महिलांना घरी बोलविण्यात आले. तुम्हाला किती चांगला लाभ मिळवून दिला हे भावनिक होऊन पटवून देण्याचे काम केले. या महिलांकडून स्वतःचे औक्षण करून घेतल्याची चर्चा आहे.
मात्र,औक्षण करण्यासाठी वापरले कुंकू व धातूचे ताट याच नेत्याच्या घरचे तर भरवलेला पेढा त्यांनीच आणलेला. त्यामुळे एवढा अट्कटाहास कशासाठी हा प्रश्न उपस्थित होत आहे. आता या बनवाबनवी करणाऱ्या नेत्याला पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भागातील सर्वसामान्य लोकांनी ओळखले असून निवडणुका डोळ्यासमोर ठेवून यांचा भावनिकतेचा खेळ सुरू झाल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. त्यामुळे विकासाचा मुद्दा बाजूला ठेवून लाडकी बहीण योजनेचा मुद्दा पुढे करण्यास सुरुवात झाली आहे. परंतु,याच नेत्याच्या कार्यकर्त्यांनी ज्या महिलांचे ऑनलाईन अर्ज भरले त्यातील हजारो महिलांचे अर्ज अजूनही पेंडिंग आहेत. त्यांचे काय होणार हे सांगण्यात नेते लोक विसरून गेले असल्याचे दिसत आहे.