दूधगंगा संघाकडून गाईच्या दुधाला रु.३० दर मिळणार – राजवर्धन पाटील.
इंदापूर,दि.२२
- इंदापूर येथील दूधगंगा दूध उत्पादक सहकारी संघाकडून दूध उत्पादक शेतकऱ्यांना गाईच्या दुधाला रविवार दि.२१ जुलैपासून प्रति लिटरला रु.३० दर मिळणार आहे, अशी माहिती दूध संघाचे संचालक राजवर्धन पाटील यांनी दिली.
राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष व दूध संघाचे संस्थापक हर्षवर्धन पाटील यांचे मार्गदर्शनाखाली दूधगंगा दूध संघ प्रगतीपथावर असून, सध्या संघाचे प्रतिदिनी १.२५ लाख लिटर दूध संकलन होत आहे. संघाकडून दुध उत्पादक शेतकऱ्यांना ३.५ फॅट, ८.५ एसएनएफ या गुणप्रतीसाठी गाईच्या दुधास प्रतिलिटर रु.३० प्रमाणे दर मिळणार आहे.३.५ फॅट च्या पुढील वाढीव फॅटला प्रति पॉईंट नुसार वाढीव दर मिळेल. या दराबरोबर राज्य शासनाकडून गाईच्या दुधाला प्रति लिटरला रु. ५ एवढे अनुदानही दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे, त्यामुळे दूध उत्पादक शेतकऱ्यांना आता गाईच्या च्या दुधाला प्रति लिटरला किमान ३५ रुपये दर मिळणार आहे, अशी माहितीही राजवर्धन पाटील यांनी दिली.
दुधगंगा संघाच्या दूध पॅकिंग, पनीर, आदी उपपदार्थांनाही बाजारात चांगली मागणी आहे. तसेच दुधगंगा दूध संघाच्या नावाच्या ब्रॅण्ड ने मिनरल पाण्याच्या बॉटलही बाजारात विक्रीसाठी उपलब्ध असल्याचे राजवर्धन पाटील यांनी याप्रसंगी सांगितले. यावेळी दूध संघाचे अध्यक्ष उत्तम जाधव, उपाध्यक्ष विक्रम कोरटकर उपस्थित होते.