मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेची प्रभावी अंमलबजावणी करा- कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा.
पुणे, दि.२१
- मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना ही बेरोजगार युवकांसाठी एक चांगली योजना असून या योजनेची जिल्ह्यात प्रभावी अंमलबजावणी करावी, असे निर्देश कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी केले.
शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था औंध येथे मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी मंत्री श्री. लोढा बोलत होते. यावेळी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेचे समन्वय अधिकारी ऋषिकेश हुंबे, कौशल्य विकास पुणे विभागाचे सहसंचालक रमाकांत भावसार, जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी उदयशंकर सुर्यवंशी आदी उपस्थित होते.
बैठकीत मंत्री श्री. लोढा यांनी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेची अंमलबजावणी कशी करावी, योजनेचा उद्देश, योजनेचे स्वरूप, योजनेचे लाभार्थी याबाबत मार्गदर्शन केले.
ते म्हणाले, मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेंतर्गत प्रशिक्षणार्थीना त्यांच्या शैक्षणिक अर्हतेप्रमाणे शासनामार्फत १२ वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना ६ हजार रुपये, आयटीआय/पदविकाधारक विद्यार्थ्यांना ८ हजार तर पदवीधर, पदव्युत्तर विद्यार्थ्यांना १० हजार रुपये विद्यावेतन दरमहा डीबीटी पद्धतीने देण्यात येणार आहे.
युवकांना कौशल्यपूर्ण प्रशिक्षण, सॉफ्टस्किल ट्रेनिंग, लाईफस्किल ट्रेनिंग, तांत्रिक प्रशिक्षण देवून तरुणांची रोजगारक्षमता वाढविणे तसेच शिक्षण घेतांना कामाच्या ठिकाणी कामाशी संबंधित कार्यकौशल्य आत्मसात करणे या उद्देशाने ज्या अभ्यासक्रमात कमीत कमी ६ महिन्यांचा ऑन जॉब ट्रेनिंग किंवा ॲप्रेंटिसशिप अंतर्भूत आहे, अशा अभ्यासक्रमांतील विद्यार्थीदेखील मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेसाठी पात्र ठरतील.
दरवर्षी राज्यातील दहा लाख उमेदवारांना या योजनेचा लाभ देण्यात येईल आणि शासकीय, निमशासकीय, खाजगी आस्थापना योजनेत सहभागी असतील. या योजनेचा लाभ घेण्यासाठी इच्छुक उमेदवारांनी कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभागाच्या https://rojgar .mahaswayam.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन नोंदणी करावी, असे आवाहन देखील मंत्री श्री. लोढा यांनी केले.
योजनेची तपशीलवार माहिती शासन निर्णयात देण्यात आली असून इच्छुक उमेदवारांनी त्याचे अवलोकन करावे आणि संधीचा लाभ घ्यावा असे श्री. भावसार यांनी सांगितले.