पुणे,दि.५ (जितेंद्र जाधव)
- जगातील सर्वाधिक मानधन घेणाऱ्या सीईओची जेव्हा जेव्हा चर्चा होते. तेव्हा गुगलचे सुंदर पिचाई, मायक्रोसॉफ्टचे सत्या नडेला, ॲडोबचे शंतनू नारायण आदींची नावे समोर येतात.
पण आता आणखी एका भारतीय वंशाच्या सीईओने या सर्वांना मागे टाकले आहे. त्यांचा रोजचा पगार केवळ 10 किंवा 20 कोटी रुपये नाही तर 40 कोटींहून अधिक आहे. ते जगातील सर्वाधिक पगार घेणारे कर्मचारी बनले आहे.
घेतात दररोजचा 48 कोटी रुपये पगार
क्वांटमस्केप कंपनीचे संस्थापक आणि कंपनीचे माजी सीईओ जगदीप सिंग यांच्याबद्दल आम्ही आज तुम्हांला सांगणार आहोत. भारतीय वंशाच्या जगदीप सिंग यांना एका वर्षात 17,500 कोटी रुपये पगार मिळाला आहे. म्हणजेच त्यांना दररोज सुमारे 48 कोटी रुपये पगार मिळत होता. अनेक कंपन्यांना त्याच्या वार्षिक पगाराइतका महसूल मिळत नाही. एवढ्या पगारामुळे जगदीप सिंग चांगलेच प्रसिद्धीच्या झोतात आले आहे.
कोण आहे जगदीप सिंग?
जगदीप सिंग यांनी स्टॅनफोर्ड विद्यापीठातून बीटेक आणि कॅलिफोर्निया विद्यापीठ, बर्कले येथून एमबीए पूर्ण केले आहे. क्वांटमस्केपची स्थापना करण्यापूर्वी त्यांनी 10 वर्षे वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये काम केले होते. यामुळे त्यांना बॅटरी तंत्रज्ञानातील क्रांतिकारी प्रगतीची संधी समजून घेण्याची संधी मिळाली आहे. जगदीप सिंग यांनी 2010 मध्ये कंपनीची स्थापना केली. त्यांची कंपनी क्वांटमस्केप नवीन पिढीतील सॉलिड-स्टेट रिचार्जेबल लिथियम मेटल बॅटरी बनवते. या बॅटरी इलेक्ट्रिक वाहनांमध्ये (ईव्ही) वापरल्या जातात. फोक्सवॅगन आणि बिल गेट्ससारख्या दिग्गजांनीही त्याच्या कंपनीत गुंतवणूक केली आहे. क्वांटमस्केप कंपनीचे मुख्यालय कॅलिफोर्नियामध्ये आहे.
एवढा पगार कसा मिळाला?
क्वांटमस्केप कंपनी वर्ष 2020 मध्ये यूएस स्टॉक मार्केटमध्ये सूचीबद्ध झाली आहे. या कंपनीला गुंतवणूकदारांचा मोठा पाठिंबा मिळाला आहे. जगदीप सिंगच्या पगाराच्या पॅकेजमध्ये 2.3 अब्ज डॉलर्सच्या शेअर्सचाही समावेश आहे. यामुळे त्यांचा वार्षिक पगार सुमारे 17,500 कोटी रुपये होता.
इनोव्हेशनवर देतायेत भर
जगदीप सिंग नाविन्यपूर्णतेसाठी ओळखले जातात. त्यांच्या कंपनीत बनवलेल्या सॉलिड-स्टेट बॅटऱ्या सामान्य बॅटऱ्यांपेक्षा खूप पुढे आहेत. ते केवळ दीर्घकाळ वीज देत नाहीत तर त्वरीत चार्ज देखील होतात. या कारणास्तव, ते ईव्हीमध्ये मोठ्या प्रमाणावर वापरले जात आहेत. सध्या ईव्ही क्षेत्रात भरभराट होत असल्याने त्यांची कंपनीही नवीन उंची गाठत आहे
राजीनामा देऊनही प्रवास सुरूच
सिंग यांनी फेब्रुवारी २०२४ मध्ये क्वांटमस्केपच्या सीईओ पदाचा राजीनामा दिला होता. त्यावेळी त्यांनी कंपनीची जबाबदारी शिवा शिवराम यांच्याकडे सोपवली होती. मात्र, राजीनामा दिल्यानंतरही त्यांनी आपले काम सुरूच ठेवले. सध्या ते ‘स्टेल्थ स्टार्टअप’चे सीईओ आहेत. एक्सवरील त्यांच्या अकाउंट द्वारे तो त्याच्या योजनांची माहिती देत असतात.