मुंबई,दि.१४
वर्ल्ड चॅम्पियन्स ऑफ लीजेंड स्पर्धेच्या फायनलमध्ये इंडिया चॅम्पियन्स संघाने पाकिस्तान चॅम्पियन्स संघाचा 5 विकेटने पराभव करत स्पर्धा जिंकली आहे. या सामन्यात भारतीय चॅम्पियन्सकडून सर्वच खेळाडूंनी चांगली कामगिरी केली.
अंबाती रायडूने ५० धावांची खेळी केली. त्याने भातचाच्या विजयात मोलाची भुमिका बजावली. या सामन्यात नेमकं काय घडलं याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात…
पाकिस्तानची सावध फलंदाजी
या सामन्यात पाकिस्तानचा कर्णधार युनूस खानने टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. प्रथम फलंदाजी करताना पाकिस्तान चॅम्पियन्सने १५६ धावा केल्या. सलामीवीर शरजील खानला आज मोठी खेळी करता आली नाही आणि तो १२ धावा करून बाद झाला. यानंतर कामरान अकमल आणि सोहेब मकसूद यांनी पाकिस्तानचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. कामरानने २४ धावा केल्या मात्र तो पवन नेगीच्या गोलंदाजीवर बाद झाला.
शोएब मलिकची फटकेबाजी
यानंतर मैदानात उतरलेल्या शोएब मलिकने ३६ चेंडूत ४२ धावा केल्या. या खेळीत त्याने ३ षटकार मारले. त्याच्यामुळेच पाकिस्तान चॅम्पियन संघ सन्मानजनक धावसंख्या गाठण्यात यशस्वी ठरला. भारताकडून अनुरीत सिंगने सर्वाधिक ३ विकेट घेतल्या. त्यांच्याशिवाय विनय कुमार, पवन नेगी आणि इरफान पठाण यांनी प्रत्येकी १ विकेट घेतली.
भारताची खराब सुरुवात
पाकिस्तानना दिलेल्या १५७ धावाच्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारताची सुरुवात खूपच खराब झाली. सलामीवीर रॉबिन उथप्पा आणि सुरेश रैना एकाच ओव्हरमध्ये आऊट झाले. मात्र त्यानंतर अंबाती रायडू आणि गुरकीरत सिंग यांनी अप्रतिम फलंदाजी केली. या दोन्ही खेळाडूंनी संघाला लक्ष्याच्या जवळ नेले. रायुडूने २९ चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले. पण पुढच्याच चेंडूवर तो बाद झाला. त्याने आपल्या ५० धावांच्या खेळीत ५ चौकार आणि २ षटकार मारले.
इरफान पठाणचा विजयी चौकार
गुरकीरत सिंगने ३४ धावांचे योगदान दिले. शेवटी युसूफ पठाणने १६ चेंडूत ३० धावा करत इंडिया चॅम्पियन्स संघाला विजय मिळवून दिला. तर कर्णधार युवराज सिंग १५ धावा करून नाबाद राहिला. ऑलराऊंडर इरफान पठाणने चौकार मारून भारतीय चॅम्पियन्सला विजय मिळवून दिला.
पाकिस्तान चॅम्पियन्सकडून आमिर यामीनने सर्वाधिक २ बळी घेतले. तसेच सईद अजमल, वहाब रियाझ आणि शोएब मलिक यांनी प्रत्येकी १ विकेट घेतली. मात्र उर्वरित गोलंदाजांना चांगली कामगिरी करता आली नाही. त्यामुळे इंडिया चॅम्पियन्सच्या फलंदाजांनी शानदार फलंदाजी करत भारताला विजय मिळवून दिला.