निमगाव केतकीच्या तुषार जाधव यांना जिल्हा परिषदेचा शब्द…?
इंदापूर,दि.१२
- इंदापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे विद्यमान सभापती तुषार जाधव यांनी नुकतेच अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसचे घड्याळ हाती घेतले.त्यामुळे निमगाव केतकी मध्ये राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या जुन्या निष्ठावंत नेत्यांपैकी कोणाच्या घड्याळाचे काटे उलटे फिरणार अशी चर्चा आता सुरू झाली आहे.
सभापती तुषार जाधव यांना निमगाव केतकी- निमसाखर जिल्हा परिषद गटाची उमेदवारी दिली जाणार असल्याची चर्चा आहे. तुषार जाधव यांचे निमगाव केतकी निमसाखर गटात मोठे वर्चस्व आहे. तुषार जाधव यांचे वडील देवराज जाधव व चुलते अंकुश जाधव यांची या गटावर पूर्वीपासून पकड आहे. राष्ट्रवादी चे दशरथ डोंगरे यांचा पराभव करून देवराज जाधव पंचायत समिती गणातून निवडून आले होते.
परंतु नंतर झालेल्या निमगाव केतकी ग्रामपंचायत निवडणुकीत दशरथ डोंगरे यांचे पुत्र प्रवीण डोंगरे यांनी वडिलांच्या पराभवाचा वाचपा ग्रामपंचायत निवडणुकीत तुषार जाधव यांचा पराभव करून काढला.नुकताच त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्याने आमदार दत्तात्रय भरणे यांचे पारडे जड झाले आहे. तुषार जाधव हे प्रवीण डोंगरे यांच्यावर वरचढ होत असल्याचे बोलले जात आहे.
२०१९ ला विधान सभेच्या निवडणुकीत निमगाव केतकी मधून भरणे यांना १७०० मतांचे लीड मिळाले होते. मात्र दोन्ही विरोधक एकत्र आल्याने हे लीड किती मतांवर जाणार याची उत्सुकता संबंध तालुक्याला लागून राहिली आहे. त्यात तुषार जाधव यांनी प्रचारात प्रचंड आघाडी घेत कार्यकर्त्यांची सक्रिय टीम मामांच्या पाठीमागे उभी केली आहे. जर निमगाव केतकी मधून भरणे यांना मताधिक्य मिळाले तर त्यामध्ये तुषार जाधव यांचा मोलाचा वाटा असणार आहे.
निमगाव केतकी मध्ये राष्ट्रवादी अजितदादांच्या नेत्यांकडून जनता गृहीत…?
निमगाव केतकी मध्ये कायम एकमेकांचे कट्टर विरोधक राहिलेले नेते एका व्यासपीठावरती आले आहेत. या नेत्यांकडून संपूर्ण गाव आमच्याच पाठीमागे आहे असे अजित पवार यांची निमगाव केतकी मध्ये झालेल्या सभेवेळी भासवून या गावातून ४ ते ५ हजारांचे सर्वाधिक लीड मामांना देण्याचा शब्द दिला आहे. गावातील सर्व मतदार या नेत्यांकडून गृहीत धरला आहे. मात्र जनतेशी कोणतीही विचारपूस न करता स्वार्थासाठी एकत्र आलेल्या नेत्यांना येणाऱ्या निवडणुकीत पुरोगामी विचाराचे निमगाव केतकी मधील मतदार कायमचा धडा शिकून फुले-शाहू- आंबेडकरांचा विचार ज्वलंत ठेवतील अशी चर्चा सुरू आहे.