इंदापूर मधील पोलीस अधिकाऱ्यांवरील चुकीच्या कारवाईने पोलीस कर्मचाऱ्यांचे खच्चीकरण.
सदरची कारवाई तात्काळ मागे घेण्याची प्रत्यक्षदर्शी व सामाजिक कार्यकर्त्यांची मागणी.
इंदापूर ,दि.५
- इंदापूर मध्ये गेल्या चार-पाच दिवसांपूर्वी सोशल मीडियात एक व्हिडिओ वायरल करण्यात आला. या वायरल व्हिडिओच्या माध्यमातून एका युवकाला पोलीस अधिकाऱ्यांकडून बेदम मारहाण केल्याची माहिती सांगण्यात आली. या व्हिडिओमुळे पोलीस खात्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी संबंधित तीन पोलीस अधिकाऱ्यांचे तात्काळ निलंबन केले. या चुकीच्या पद्धतीने केलेल्या कारवाईमुळे इंदापूर तालुक्यासह पुणे जिल्ह्यातील पोलीस खात्यातील कर्मचाऱ्यांचे व अधिकाऱ्यांचे खच्चीकरण झाले असून सदरची कारवाई तात्काळ मागे घेण्यात यावी अशी मागणी प्रत्यक्षदर्शी व सामाजिक कार्यकर्त्यांच्या माध्यमातून करण्यात येत आहे.
ज्या पोलीस अधिकाऱ्यांवरती कारवाई करण्यात आली त्या पोलीस अधिकाऱ्यांची “कोणतीही चौकशी न करता’ अथवा त्यांना म्हणणे मांडण्याची संधी न देता पोलीस अधिकाऱ्यांनी कुणाच्या तरी दाबामुळे स्वतःची प्रतिमा उंचावण्यासाठी सदरची कारवाई करण्यात आली असल्याची माहिती ॲड आशुतोष भोसले यांनी काल इंदापूर मध्ये झालेल्या पत्रकार परिषदेत दिली. वास्तविक, पाहता सदरची कारवाई कोणालातरी वाचवण्यासाठी करण्यात आल्याची चर्चा इंदापूर तालुक्यात सुरू आहे.
सदर प्रकरणात प्रत्यक्षदर्शी च्या माध्यमातून मिळालेल्या माहितीवरून एका मुलाला एका व्यक्तीने गाडीवर जात असताना लिफ्ट मागितली. तो व्यक्ती सदर अल्पवयीन मुलाच्या गाडीवर बसल्यानंतर त्या व्यक्तीने गाडी चालवत असलेल्या अल्पवयीन मुलाच्या प्रायव्हेट जागेवर स्पर्श करत अश्लील चाळे सुरू केले. नंतर त्या अल्पवयीन मुलाने आरडाओरडा सुरू केला त्याचवेळी सदर मुलाला तीन पोलीस अधिकारी समोर दिसले. त्या मुलाने त्या पोलीस अधिकाऱ्यांना जाऊन जी घटना घडली त्याची माहिती दिल्यानंतर पोलिसांनी तात्काळ संबंधित अश्लील चाळे करणाऱ्या व्यक्तीला ताब्यात घेऊन पोलीस स्टेशनला आणले.
सदर “अंग पिसाड’ व्यक्तीला पोलीस स्टेशनला आणल्यानंतर मारहाण न करता दबाव टाकत स्पष्टपणे तोंडी समज देण्यात आली. त्यावेळी काही प्रत्यक्षदर्शी इंदापूर पोलीस स्टेशनच्या आवारात होते. आरोपी म्हटलं की त्याला पोलीस स्टेशनला आणून “हार तुरे दिले जात नाहीत तर त्याला त्याच पद्धतीने समज दिली जाते. तशीच समज संबंधित व्यक्तीला दिली गेली होती. त्याला मारहाण केली गेली नव्हती परंतु सोशल मीडियामध्ये एक व्हिडिओ वायरल करण्यात आला आणि त्या व्हिडिओ मध्ये पोलीस अधिकाऱ्यांनी अमनुष्यपणे मारहाण केल्याचे सांगितले गेले मात्र तसे दिसले नाही.
या सर्व गोष्टी झाल्यानंतर वरिष्ठ पोलीस अधिकारी इंदापूर मध्ये दाखल झाले त्यांनी इंदापूर पोलीस स्टेशनच्या आवारातील कोणत्याही सीसीटीव्हीचे फुटेज पाहिले नाही. वायरल व्हिडिओचे कोणत्याही लॅबमध्ये जाऊन त्याची पडताळणी न करता कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी काम करणाऱ्या चांगल्या तीन अधिकाऱ्यांचे निलंबन केले गेले. या निलंबनानंतर इंदापूर मध्ये सामाजिक क्षेत्रात व इतर क्षेत्रांमध्ये काम करणाऱ्या लोकांमध्ये पोलीस खात्यातील वरिष्ठ अधिकारी व राज्याच्या गृहमंत्र्यांबाबत प्रचंड असंतोष निर्माण झाला असून सदरची कारवाई तात्काळ मागे घेण्यात यावी अशी मागणी जोर धरू लागली आहे.
गृहमंत्र्यांना सहानभूती मिळवण्यासाठी सदरची कारवाई.
राज्यात कायदा आणि सुव्यवस्थेचे धिंडवडे उडाले आहेत. दररोज एक एक घटना धक्कादायक समोर येत असल्याने राज्य शासनाच्या कामकाजावर व गृहमंत्र्यांच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. त्यातच इंदापूर पोलीस स्टेशनच्या कार्यक्षेत्रात तहसीलदार श्रीकांत पाटील यांच्यावर हल्ला, इंदापुर मध्ये एका तरुणावर गोळीबार अशा गंभीर घटना घडल्या आहेत. या सर्व गोष्टीकडे सामान्य लोकांचे लक्ष जाऊ नये म्हणून कर्तव्य चोख पणे बजावणाऱ्या तीन पोलीस अधिकाऱ्यांवरती हेतू परस्पर व स्वतःचे अपयश लपवण्यासाठी कारवाई केली गेल्याचे सर्वसामान्य लोकांचे म्हणणे आहे.
प्रत्यक्षदर्शींचा जबाब नोंदवून पोलीस स्टेशनच्या आवारातील सीसीटीव्ही फुटेज सर्वसामान्यांसाठी खुले करा.
ज्या दिवशी इंदापूर पोलीस स्टेशनला घटना घडली त्यावेळी इंदापूर पोलीस स्टेशनच्या आवारामध्ये काही पोलीस कर्मचारी, सामाजिक कार्यकर्ते, पत्रकार व नागरिक उपस्थित होते. या सर्वांचे कारवाई अगोदर जबाब नोंदवणे गरजेचे होते. तसेच पोलीस स्टेशनच्या आवारामध्ये सीसीटीव्ही फुटेज पाहणे गरजेचे असताना केवळ सूडबुद्धीने कारवाई करण्यात आली. त्यामुळे संबंधित अधिकाऱ्यांनी स्वतःची विश्वासार्हता व खचलेले पोलिसांचे मनधौर्य पुन्हा वाढवण्यासाठी त्या ठिकाणी उपस्थित असलेल्या प्रत्यक्षदर्शींचा चा जबाब नोंदवत सर्व सीसीटीव्ही फुटेज जनतेसाठी खुले करत योग्य ती कारवाई करावी. जर त्यामध्ये संबंधित अधिकारी दोषी नसतील तर त्यांच्यावरील केलेली कारवाई तात्काळ मागे घेण्यात यावी. अन्यथा भविष्यात इंदापूर पोलीस स्टेशनला चांगले अधिकारी व कर्मचारी येणार नाहीत.