इंदापूर तालुक्यात बाहेर गावच्या ठेकेदारांना कामे मात्र,स्थानिक ठेकेदारांवरती अन्याय ?
राज्यकर्त्यांच्या नाकारतेपणामुळे स्थानिक ठेकेदारांवर उपासमारीची वेळ.?

इंदापूर,दि.२२
- इंदापूर तालुक्यामध्ये मागील काही काळामध्ये कोट्यावधी रुपयांची विकास कामे झाली व काही कामे चालू आहेत. ही विकास कामे स्थानिक ठेकेदारांना न मिळू देता, दुसऱ्या जिल्ह्यातील व तालुक्यातील ठेकेदारांना बोलवून दिली गेली आहेत. त्यामुळे बाहेर गावाहून बोलून घेतलेल्या ठेकेदारांना इंदापूर तालुक्यात कामे मिळू लागली असून स्थानिक ठेकेदारांना कामे न मिळाल्याने संघर्ष करावा लागत असून स्थानिक ठेकेदारांवरती अन्याय होत असल्याची चर्चा सुरू आहे.
मागील काही काळामध्ये इंदापूर तालुक्यामध्ये कोट्यावधी रुपयांची विकास कामे झाली. या विकास कामांमधील ९० टक्के विकास कामे ही बाहेरील ठेकेदारांना ठेका/कामे देऊन करण्यात आली. यामधील १० टक्के विकास कामे केवळ इंदापूर मधील स्थानिक ठेकेदारांना देण्यात आली. या सर्व गोष्टींमुळे बाहेरील ठेकेदार मालामाल झाले असून स्थानिक ठेकेदारांना मात्र, विकास कामांचा ठेका मिळवण्यासाठी संघर्ष करावा लागत आहे. विशेष बाब म्हणजे बाहेरील ठेकेदार इंदापूर तालुक्यामध्ये येऊन स्थानिक पुढाऱ्यांसोबत हात मिळवणी करून स्वतःचा रुबाब दाखवत आहेत.
इंदापूर तालुक्यामध्ये शेकडो अधिकृत ठेकेदार आहेत. तालुक्यातील छोटी-मोठी कामे घेऊन ते तालुक्यातीलच बेरोजगार तरुणांना काम देतात. त्यामधून मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती होते.परंतु बाहेरगावाहून येऊन इंदापूर तालुक्यात ठेका घेतलेले ठेकेदार मात्र, पर राज्यातील व दुसऱ्या जिल्ह्यातील कामगार आणून कामे करून घेत आहेत. त्यामुळे स्थानिक बेरोजगार तरुणांवरती उपासमारीची वेळ ही केवळ स्थानिक पुढाऱ्यांच्या व राज्यकर्त्यांच्या नाकारतेपणामुळे येत असल्याचे दिसून येत आहे.
इंदापूर मधील अनेक लहान, मोठ्या ठेकेदारांनी तालुक्यातील कामे मिळतील या आशेने लहान-मोठे बँकेकडून लोन काढून छोट मोठे प्लांट उभा केले आहेत. मात्र तालुक्यात सध्या कामे मिळत नसल्याने हे उभा केलेले प्लांट बंद पडू लागले असून आर्थिक अडचणीचा सामना करावा लागत आहे. त्यातच स्थानिक पुढाऱ्यांनी बाहेरील ठेकेदारांना बोलवून इंदापूर तालुक्यातील ठेकेदारांवरती व बेरोजगार तरुणांवरती उपासमारीची वेळ आणली असल्याचे चित्र सध्या इंदापूर तालुक्यात स्पष्टपणे दिसत असून जाणवत आहे.
बाहेरगावच्या ठेकेदारांवरती स्थानिक राज्यकर्त्यांचा जीव…?
इंदापूर तालुक्यामध्ये सोलापूर, नांदेड, सातारा, पुणे, बारामती सह मध्य प्रदेश राज्यातील ठेकेदारांचा मोठा भरणा आयात करण्यात आला आहे. हे ठेकेदार स्थानिक पुढाऱ्यांना तळ हातातील फोडाप्रमाणे जपत असून पुढार्यांची व नेत्याची मर्जी मानत आहेत. तसेच बाहेरगावचे ठेकेदार विकास कामांसाठी अधिकचा व वाढीव मोबदला स्थानिक नेत्यांच्या घशामध्ये घालत असल्यामुळे केवळ स्थानिक ठेकेदारांना डावलून बाहेर जिल्ह्यातील व परराज्यातील ठेकेदारांना आयात केले जात आहे. याचे उत्तम उदाहरण म्हणजे इंदापूर तालुक्यात निकृष्ट कामे करून ही पुन्हा एकदा कोट्यावधी रुपयांचा ठेका मिळवणारी एनपी इन्फ्रा, त्रिमूर्ती इन्फ्रा कंट्रक्शन -टेंभुर्णी, यशदीप कंट्रक्शन -बीड या दुसऱ्या जिल्ह्यातील कंपन्या उत्तम उदाहरण आहे.



