निरवांगी खुन प्रकरणातील आरोपीला प्रभारी पोलीस अधिकारी राजकुमार डुणगे यांच्या टीमने ठोकल्या बेड्या.
वालचंदनगर पोलिस व स्थानिक गुन्हे शाखा पोलिसांची कारवाई

इंदापूर,दि.१
- इंदापूर तालुक्यातील निरवांगी या गावाजवळ झालेल्या खुन प्रकरणातील पाच आरोपींना वालचंदनगर पोलीस स्टेशनचे प्रभारी पोलिस अधिकारी राजकुमार डुणगे व वालचंदनगर पोलिस तसेच स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांच्या कारवाई मध्ये अवघ्या काही तासात जेरबंद करण्यात यश आले आहे.
याप्रकरणी पोलिसांनी आठ जणांवर गुन्हा दाखल केला असून यातील राजेंद्र उर्फ राजु भाळे, रामदास उर्फ रामा भाळे ,नाना भागवत भाळे (रा.सर्वजण खोरोची) , शुभम उर्फ दादा आटोळे, (रा.शेळगाव) व स्वप्निल उर्फ बालाजी वाघमोडे (रा. रेडणी) या पाच आरोपींना २४ तासाच्या आतमध्ये अटक केली. हे आरोपी हैद्राबादला पळून जाण्याच्या तयारीमध्ये होते. या घटनेमध्ये उत्तम जालिंदर जाधव (वय ३४,रा.खोरोची) यांचा उपचार सुरु असताना मृत्यू झाला.
वालचंदनगर पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार गुरुवार दुपारी १२:३० वाजण्याच्या सुमारास उत्तम जाधव हे निमसाखर गावच्या हद्दीमध्ये जेसीबी चालकाला जेवणाचा डब्बा देण्यासाठी गेले असताना राजु भाळे, रामा भाळे ,नाना भागवत भाळे (रा.सर्वजण खोरोची) , दादा आटोळे, (रा.शेळगाव) , बालाजी वाघमोडे (रा. रेडणी), तुकाराम खरात, निरंजन पवार (रा.खोरोची), जिजा ऊर्फ मयुर पाटोळे (रा.निमसाखर) या आठ जणांनी जाधव यांच्यावर कोयता,तलवारीने वार करुन लोखंडी रॉडने तसेच पाय दगडाने ठेचले होते. उत्तम जाधव हे गंभीर जखमी झाले होते.
जाधव यांना उपचारासाठी अकलुज मधील खासगी रुग्णालयामध्ये दाखल केले होते. उपचार सुरु असताना गुरुवारी रात्री मृत्यू झाल्याची घटना घडली. वालचंदनगर पोलिसांनी रात्री उशीरा गुन्हा दाखल केल्यानंतर वालचंदनगर पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक राजकुमार डुणगे यांच्यासह कर्मचाऱ्यांनी तातडीने तपासाला सुरवात करुन आरोपींना अटक करण्यासाठी पोलिस पथके रवाना केली. अवघ्या काही तासांच्या आतमध्ये पोलिसांनी आरोपींना जेरबंद केले आहे.याप्रकरणी शामराव जालिंधर जाधव (वय वय-३६) यांनी वालचंदनगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
सदरची कामगिरी पुणे जिल्हाचे पोलिस अधिक्षक पंकज देशमुख, अप्पर पोलिस अधिक्षक गणेश बिरादार ,बारामतीचे उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ.सुदर्शन राठोड, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री.अविनाश शिळीमकर, यांच्या मार्गदर्शनाखाली वालचंदनगर पोलीस स्टेशनचे सहायक राजकुमार डुणगे, सहायक पोलीस निरीक्षक, कुलदिप संकपाळ पोलीस उपनिरीक्षक मिलिंद मिठापल्ली, विजय टेळकीकर, गुलाबराव पाटील, शैलेश स्वामी, जगदीश चौधर, गणेश काटकर, दादासाहेब डोईफोड़े, दत्तात्रेय चांदणे, महेश पवार, विकास निर्मळ, अभिजीत कळसकर,विक्रमसिंह जाधव, गणेश वानकर , बाळासाहेब कारंडे, अभिजीत एकशिंगे, स्वप्नील अहिवळे, अतुल ढेरे यांनी केली.
सदरच्या खुन प्रकरणातील आरोपी,मयत व फिर्यादी हे एकाच गावातील असुन गेले अनेक वर्षापासुन त्यांच्यामध्ये वर्चस्वावरुन वेळोवेळी भांडणे झाली आहेत. तसेच गुरुवारी राजु भाळे याने संकेत हेगडकर यांच्यावर गोळीबार केला होता. सदरचा खुन वर्चस्वावरुन झाला असल्याचे वालचंदनगर पोलिसांनी सांगितले.