हा इथला नीच मंत्री ; प्रदीप गारटकर यांची मंत्री दत्तात्रय भरणे यांच्यावर जहरी टीका.

इंदापूर,दि.५
- पुणे जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यात पोहोचला असतानाच इंदापूर तालुक्यात राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे.वडापुरी–माळवाडी जिल्हा परिषद गटातील प्रचार सभेदरम्यान भाजपचे इंदापूरमधील बडे नेते प्रदीप गारटकर यांनी थेट राज्याचे मंत्री दत्तात्रय भरणे यांच्यावर जहरी आणि आक्रमक शब्दांत टीका केल्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियामध्ये प्रचंड व्हायरल होत आहे.
प्रदीप गारटकर हे एकेकाळी मंत्री दत्तात्रय भरणे यांचे निकटवर्तीय आणि सहकारी म्हणून ओळखले जात होते. मात्र जिल्हा परिषद निवडणुकीआधी त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आणि सध्या जिल्हा परिषद निवडणुकीत ते आघाडीवर प्रचार करत आहेत. याच पार्श्वभूमीवर झालेल्या प्रचार सभेत त्यांनी केलेल्या वक्तव्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आलं असून त्यांचा या वक्तव्याचा व्हिडिओ सोशल मीडियात प्रचंड वायरल होत असताना दिसत आहे.
वडापुरी–माळवाडी जिल्हा परिषद गटातील प्रचार सभेत बोलताना प्रदीप गारटकर यांनी मंत्री दत्तात्रय भरणे यांच्यावर गंभीर आरोप केले. गारटकर म्हणाले की, “हा मंत्री इतका नीच आहे की तो तहसीलदार आणि पोलिसांना फोन करून सांगतो—गारटकरचा फोन आला तर त्याचं काम करू नका.माझं काही घरचं काम होतं का? ती कामं गोरगरिबांची होती. यांची वृत्ती फारच घाणेरडी आहे,” असा आरोप त्यांनी केला.प्रचार सभेतील हा संपूर्ण व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत असून त्यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटत आहेत.
मंत्री दत्तात्रय भरणे हे महाराष्ट्र मंत्रिमंडळातील धनगर समाजाचे एकमेव मंत्री आहेत. इंदापूर तालुक्यात तसेच पुणे जिल्ह्यात त्यांचा मोठा समर्थक आणि मतदार वर्ग आहे. त्यामुळे गारटकर यांनी केलेल्या टीकेमुळे मंत्री दत्तात्रय भरणे यांच्या समर्थकांकडून तीव्र नाराजी व्यक्त केली जात असून अनेक ठिकाणी या वक्तव्याबाबत उलट सुलट चर्चा सुरू झाल्या आहेत.
राजकीय विश्लेषकांच्या मते, निवडणुकीच्या तोंडावर अशा प्रकारची वैयक्तिक आणि टोकाची टीका ही प्रचाराची दिशा बदलणारी ठरू शकते. एकीकडे आरोप-प्रत्यारोपांची धार वाढत असताना दुसरीकडे मतदारही या वादाकडे गांभीर्याने पाहत आहेत.
प्रदीप गारटकर यांच्या या आरोपांवर मंत्री दत्तात्रय भरणे यांची अधिकृत प्रतिक्रिया अद्याप समोर आलेली नाही. मात्र येत्या काळात मंत्री भरणे या टीकेला काय उत्तर देतात, तसेच या वादाचा जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीवर नेमका काय परिणाम होतो, याकडे लक्ष लागून राहिलं आहे.



