“छत्रपती’ ची निवडणूक “पृथ्वीराज” पर्वाने गाजवली.
अदृश्य हातांना मतदारांनी दाखवला कात्रज चा घाट.

भवानीनगर,दि.१९
- गेली अनेक महिने श्री. छत्रपती साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीची चर्चा चालू होती. अखेर ती पंचवार्षिक निवडणूक काल पार पडत निकाल लागला.श्री. छत्रपती कारखान्याची यंदाची पंचवार्षिक निवडणूक पृथ्वीराज पर्वाने गाजवत तब्बल २१ जागांवरती विजय मिळवून निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित केले.
श्री.छत्रपती साखर कारखान्याची निवडणूक दीर्घ न्यायालयीन लढ्यानंतर म्हणजे साधारण दहा वर्षानंतर जाहीर झाली होती. या निवडणुकीत श्री छत्रपती साखर कारखान्याला गतवैभव मिळवून देणे या एकाच अट आणि शर्तीवर कायम एकमेकांचे राजकीय विरोधक राहिलेले राज्य साखर संघाचे माजी अध्यक्ष पृथ्वीराज जाचक व उपमुख्यमंत्री अजित पवार हे एकत्र आले. एकत्र आल्यानंतर अजित पवार यांनी साखर कारखान्याची जबाबदारी पृथ्वीराज बापूंनी स्वीकारावी म्हणत कारखान्याचे भावी अध्यक्ष पृथ्वीराज जाचक असतील असे स्पष्ट संकेत दिले होते.
त्यानंतर श्री.छत्रपती कारखान्याच्या निवडणुकीत श्री जय भवानीमाता पॅनलच्या माध्यमातून नव्या व जुन्या दमाच्या कार्यकर्त्यांना एकत्र घेऊन अजितदादा श्री छत्रपती साखर कारखान्याच्या निवडणुकीला सामोरे गेले. अजितदादांनी व पृथ्वीराज जाचक यांनी पृथ्वीराज घोलप यांच्या सारख्या नव्या उमेदीच्या शेतकरी पुत्राला उमेदवारी देऊन ताकत देत निवडून आणले. विशेष म्हणजे काल झालेल्या श्री.छत्रपतीच्या निवडणुकीत सर्वच्या सर्व जागा जिंकून कारखान्यावरती एक हाती सत्ता प्रस्थापित केली. विशेष म्हणजे श्री जय भवानीमाता पॅनलचे उमेदवार पाच हजारांपेक्षा अधिक मताने विजयी होत अजितदादांचा बालेकिल्ला किती भक्कम आहे हे संपूर्ण राज्याला पहावयाला मिळाले.
“पृथ्वीराज’ पर्वाची चर्चा…!!
छत्रपती साखर कारखान्याच्या निवडणुकीमध्ये श्री. जय भवानीमाता पॅनलचे प्रमुख पृथ्वीराज जाचक व त्यांच्याच पॅनलचे तरुण उमेदवार पृथ्वीराज घोलप यांच्या नावाची चर्चा मात्र कायम राहिली. कारण श्री. छत्रपती च्या यंदाच्या निवडणुकीमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार व पृथ्वीराज जाचक यांनी पृथ्वीराज घोलप यांना उमेदवारी देत नवा अध्याय मांडला होता. विशेष म्हणजे एकाच पॅनल कडून “पृथ्वीराज’ नावाच्या दोन व्यक्ती श्री.छत्रपती च्या निवडणुकीसाठी रिंगणात उतरल्या होत्या त्या दोन्हीही व्यक्ती सर्वाधिक मताधिक्याने विजयी झाल्याने श्री.छत्रपती मध्ये “पृथ्वीराज’ पर्वाला पुन्हा सुरुवात झाली आहे.
अदृश्य हाताने टेकवले गुडघे..?
श्री.छत्रपती साखर कारखान्याच्या निवडणुकीमध्ये आरोप- प्रत्यारोप दोन्ही गटांकडून एकमेकांवरती करताना ऐकण्यास मिळाले. त्यातच पूर्वीच्या निवडणुकीमध्ये एकमेकांना केलेली अदृश्य मदत व त्या मदतीची परतफेड होईल अशी ही चर्चा ऐकण्यास मिळत होती. मात्र,अजितदादांनी कार्यकर्त्यांना घातलेली साद व पृथ्वीराज जाचक यांनी श्री छत्रपती च्या सभासदांसाठी आजपर्यंत केलेले काम पाहता अदृश्य हाताने मदत करणाऱ्या लोकांना या निवडणुकीत मतदारांनी थेट कात्रज घाट दाखवत पृथ्वीराज जाचक यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहत अक्षरशः गुडघे टेकवण्यास भाग पाडले.



