राष्ट्रवादीचे हनुमंत कोकाटे यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची खा.सुप्रिया सुळे यांची ट्विटरच्या माध्यमातून पुणे ग्रामीणच्या पोलीस अधीक्षकांकडे मागणी.

इंदापूर,दि.४
- दोन दिवसापासून इंदापूर तालुक्यामध्ये दोन्ही राष्ट्रवादींमध्ये वाकयुद्ध सुरू आहे. त्यातच आज बारामती लोकसभा मतदारसंघाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी ट्विटरच्या माध्यमातून एक पोस्ट करत महारुद्र पाटील यांना मारहाण करण्याची धमकी देणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे तालुका अध्यक्ष हनुमंत कोकाटे यांच्यावरती कारवाई करण्यात यावी अशी मागणी पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक यांच्याकडे केली आहे.
त्यामुळे येणाऱ्या काळात इंदापूर तालुक्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकी अगोदर मोठे राजकारण रंगणार अशी चर्चा सध्या सुरू झाली आहे.
कारण दोन दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे शरचंद्रजी पवार पक्षाचे कार्याध्यक्ष महारुद्र पाटील यांना हाताखालून काढू असा गंभीर इशारा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे तालुका अध्यक्ष हनुमंत कोकाटे यांनी पत्रकार परिषद घेत दिला होता.
त्यानंतर आज महारुद्र पाटील यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे , पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक गिल व इंदापूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सूर्यकांत कोकणे यांच्याकडे लेखी तक्रार केली आहे.
राज्याचे कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांचे समर्थक हणुमंत कोकाटे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे (@NCPspeaks) इंदापूर तालुका कार्याध्यक्ष महारुद्र पाटील यांना जीवे मारण्याची धमकी दिली. सत्तेचा पाठिंबा असल्याशिवाय या पद्धतीने सराईतासारखी जाहिर धमकी देण्याचे धाडस कोणताही जबाबदार राजकीय नेता करु शकणार नाही. महारुद्र पाटील हे एक जबाबदार पदाधिकारी असून गेली अनेक वर्षे ते राजकारण तथा समाजकारणात सक्रिय आहेत. त्यांना ‘ऑन कॅमेरा’ धमकी देण्याचे धाडस करणाऱ्या कोकाटेंवर गुन्हा दाखल होण्याची गरज आहे. माझी पोलीस अधीक्षक, पुणे जिल्हा ग्रामीण (@puneruralpolice) यांना विनंती आहे की कृपया आपण या घटनेची गांभीर्याने दखल घ्यावी आणि सदर व्यक्तीवर गुन्हा दाखल करावा.



