इंदापूर,दि.१७
- इंदापूर तालुक्यामध्ये दिवसाढवळ्या महिलेच्या गळ्यातील मौल्यवान सोन्याचे दागिने दमदाटी व दादागिरी करून काढून घेऊन पळून जाणाऱ्या दरोड्याच्या गुन्ह्यातील आरोपींच्या इंदापूर पोलिसांनी अवघ्या चार तासात मुसक्या आवळल्या असून या कामगिरीमुळे इंदापूर पोलिसांचे कौतुक केले जात आहे.
सविस्तर माहिती अशी की इंदापूर तालुक्यातील वनगळी येथील सुभद्रा सदाशिव पारेकर या भिगवन च्या दिशेने जाण्यासाठी थांबल्या असताना. अनोळख्या चार महिला व दोन पुरुष असलेली गाडी लिफ्ट देण्यासाठी थांबवून. सुभद्रा पारेकर यांना गाडीत बसवून निर्मनुष्य ठिकाणी नेऊन जीवे मारण्याची धमकी देत दमदाटी करत गळ्यातील ४९००० रुपये किंमतीचे सोन्याचे मनीमंगळसुत्र काढून घेऊन त्यांना त्याच ठिकाणी गाडीतून खाली उतरवून सदर वाहनाने संबंधित चार महिला व दोन पुरुष पळून होते.
सदर माहिती तात्काळ इंदापूर पोलीस स्टेशनला कळविल्यानंतर सदर घटनेचे गांभीर्य ओळखून पोलीस निरीक्षक सूर्यकांत कोकणे यांच्या आदेशानुसार सहाय्यक पोलीस निरीक्षक जीवन मोहिते, सह पोलीस फौजदार प्रकाश माने, पोलीस हवालदार सलमान खान, पोलिस अलदार गणेश ढेरे, अंकुश माने, विशाल चौधर, तुषार चव्हाण, प्रवीण शिंगाडे यांनी घटनास्थळी पाहणी करून सुभद्रा पारेकर यांच्याकडून माहिती घेऊन पुणे-सोलापूर महामार्गावरील सर्व हॉटेल, लॉज, ढाबे व टोलनाक्या वरील सीसीटीव्ही फुटेज व माहितीच्या आधारे संबंधित संशयित वाहनाचा तपास सुरू झाल्यानंतर सदरचे वाहन तरंगवाडी गावच्या हळदीमध्ये पळून जात असताना दिसल्याने सदर वाहनाचा इंदापूर पोलिसांनी पाठलाग करून पकडले.
सदर वाहनातील महिला व पुरुष यांची नावे, पत्ते विचारले असता त्यांनी उडवा उडवी चे उत्तर देत खोटी नावे देऊन चुकीची माहिती देण्याचा प्रयत्न केला. मात्र इंदापूर पोलिसांनी सखोल चौकशी केली असता संबंधित सोलापूर जिल्ह्यातील सराईत टोळी असल्याचे निष्पन्न झाले आहे. या टोळीतील आरोपी संभाजी भोसले, टिपू भोसले, कावेरी उर्फ सौदर्या भोसले, ममता भोसले, चांद भोसले, महानंदा पवार,सर्व राहणार बिस्मिल्ला नगर मुळेगाव तालुका दक्षिण सोलापूर जिल्हा सोलापूर या सर्वांकडून चोरलेले सोन्याचे दागिने ताब्यात घेण्यात आले आहेत.
संबंधित सर्व आरोपींवरती सोलापूर उस्मानाबाद पुणे ग्रामीण मुंबई शहर या ठिकाणी अनेक प्रकारचे गुन्हे दाखल आहेत. तसेच त्यांच्यावरती इंदापूर पोलीस स्टेशन येथे गु.र.न १०३४/२०२४ बी एन एस कलम ३१०(२) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.