हर्षवर्धन बारामतीचे जावई; त्यांच्यावरती राज्याची जबाबदारी दिली जाणार :- शरद पवार.
हर्षवर्धन पाटलांचा हजारो समर्थकांसह शरदचंद्रजी पवार पक्षात प्रवेश.
इंदापूर, दि.७
- भाजप नेते आणि माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी आपल्या कन्या अंकिता व समर्थकांसह इंदापूरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला. या प्रसंगी शरद पवार, सुप्रिया सुळे, विजयसिंह मोहिते-पाटील, धैर्यशील मोहिते पाटील यांसारख्या दिग्गज नेत्यांनी हजेरी लावली होती.
उपस्थित जनसमुदायासंबोधित करताना शरद पवार म्हणाले की हर्षवर्धन बारामतीचे जावई आहेत. बारामतीकर उगाच कोणाच्या हातात मुलगी देत नाहीत. त्यांनी गेल्या ३०-३२ वर्षांत चांगला संसार केला आहे. उद्याच्या काळात ते महाराष्ट्राचा संसारही नेटका करतील याचा विश्वास आहे. त्यांना मोठी जबाबदारी द्यायची आहे, त्यासाठी इंदापूरकरांनी त्यांना विधानसभेवर निवडून पाठवले पाहिजे, असे म्हणत महाविकास आघाडीची सत्ता आल्यास हर्षवर्धन पाटील यांच्या मंत्रीपदाचे संकेतच शरद पवार यांनी दिले आहेत.
पवार यांनी आपल्या भाषणात हर्षवर्धन पाटील यांच्या सहकार क्षेत्रातील योगदानाचे कौतुक केले. त्यांनी सांगितले की, इंदापूरमधील साखर कारखाना समस्या असो किंवा अन्य कोणतेही कठीण कार्य, हर्षवर्धन पाटील नेहमीच समोर असत. पक्ष वेगळा असला तरी, पाटील यांच्या कर्तृत्वावर पवारांचा पूर्ण विश्वास होता. पवारांनी स्पष्ट केले की, हर्षवर्धन पाटील यांच्या येण्याने राष्ट्रवादीच्या सहकार धोरणाला आणखी बळकटी मिळणार आहे.
हर्षवर्धन पाटील यांच्या पक्षप्रवेशामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी उलथापालथ होण्याची शक्यता आहे. भाजपमधून राष्ट्रवादीत प्रवेश करून पाटील यांनी महाविकास आघाडीला नवा स्फूर्तिदायक नेता दिला आहे, त्यामुळे आगामी निवडणुकांमध्ये आघाडीला बळ मिळण्याची शक्यता आहे.
खा.सुप्रिया सुळे यांच्या इंदापूर मधील मताधिक्यात आमचा अदृष्य वाटा.
या पक्ष प्रवेश कार्यक्रमावेळी बोलताना हर्षवर्धन पाटील म्हणाले, सुप्रिया ताई आम्हाला अभिमान आहे तुम्ही चारवेळा खासदार झाला. त्यातीन तीनवेळा तुमच्या विजयात आमच प्रत्यक्ष सहभाग होता. पण कालच्या निवडणुकीला आमचा सहभाग अदृष्य होता असा खुलासा करत इंदापूरातील सुप्रिया सुळे यांच्या लीडमागे कोण होते ते स्पष्ट केले.
इंदापूरचे इंद्रधनुष्य हर्षवर्धन भाऊंच्या हातात – जयंत पाटील (प्रदेशाध्यक्ष – राष्ट्रवादी काँग्रेसचे शरदचंद्रजी पवार पक्ष)
हर्षवर्धन यांच्या उमेदवारीबद्दल पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील म्हणाले की, इंदापूरचं शिवधनुष्य हर्षवर्धन पाटील यांनी हाती घ्यावं, अशी आमची इच्छा आहे. महाविकास आघाडीचे जागा वाटप जाहीर होईपर्यंत मला उमेदवारी जाहीर करता येत नाही. मी त्यांच्या हातात तुतारी देणार आहे, असे म्हणत एकप्रकारे जयंत पाटील यांनी हर्षवर्धन पाटील यांच्या उमेदवारीची घोषणा केली आहे.