शुभांगी शिंदे गुणवडी गटातून जिल्हा परिषदेसाठी सज्ज!
शिरसुफळ–साबळेवाडी परिसरात शुभांगीताईंच्या उमेदवारीला जनतेचा उत्स्फूर्त प्रतिसाद.

बारामती,दि १४
- बारामती तालुक्यातील साबळेवाडी (शिरसुफळ) येथील ग्रामपंचायत सदस्या व माजी उपसरपंच शुभांगी कचेर शिंदे या येणाऱ्या जिल्हा परिषद निवडणुकीसाठी गुणवडी जिल्हा परिषद गटातून उमेदवारी दाखल करण्याच्या तयारीत असल्याची जोरदार चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरू आहे. त्यांच्या संभाव्य उमेदवारीला शिरसुफळ, साबळेवाडी व परिसरातील गावांमधून मोठा आणि उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.
ग्रामीण भागातील महिला सक्षमीकरणासाठी त्यांनी महिला बचत गटांच्या माध्यमातून केलेले कार्य विशेष उल्लेखनीय ठरले आहे. अनेक महिलांना आर्थिक स्वावलंबनाचा मार्ग मिळवून देत त्यांनी समाजात सकारात्मक बदल घडवून आणला आहे. ग्रामविकास, स्वच्छता अभियान, पाणीपुरवठा, महिलांचे प्रश्न तसेच युवकांच्या प्रगतीसाठी त्यांनी सातत्याने काम केल्याने गावोगावी त्यांना आदराचे स्थान प्राप्त झाले आहे.
मागासवर्गीय समाजातून पुढे आलेल्या शुभांगी शिंदे यांनी प्रामाणिक नेतृत्व, साधेपणा आणि थेट जनसंपर्क या जोरावर जनतेचा विश्वास संपादन केला आहे. त्यांच्या पतींनी पोलीस उपनिरीक्षक पदावरून नुकतीच सेवानिवृत्ती घेतली असून, सध्या दोघेही पती-पत्नी समाजसेवेच्या कार्यात सक्रिय आहेत.
शिरसुफळ, साबळेवाडी, गाडीखेल, कटफळ, पारवडी, निंबोडी, जैनवाडी, वंजारवाडी, काटेवाडी, पिंपळी व कनेरी या गावांतील ग्रामस्थ शुभांगीताईंना जिल्हा परिषदेसाठी सक्षम व विश्वासार्ह उमेदवार म्हणून पाहत आहेत. त्यांच्या कार्यतत्परतेमुळे आणि जनतेशी असलेल्या थेट संवादामुळे ग्रामीण मतदारांचा मोठा पाठिंबा त्यांना मिळताना दिसत आहे.
दरम्यान, शुभांगी शिंदे यांचे पुतणे गणेश चंद्रकांत शिंदे हे यापूर्वी साबळेवाडी गावचे सरपंच म्हणून कार्यरत होते, तर सध्या ते ग्रामपंचायत सदस्य आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे निष्ठावंत कार्यकर्ते म्हणून कार्य करत आहेत, त्यामुळे राजकीय अनुभवाची पार्श्वभूमीही या कुटुंबाला लाभलेली आहे.
ग्रामीण महिलांसाठी प्रेरणास्थान ठरलेल्या शुभांगी शिंदे यांचा जिल्हा परिषद निवडणुकीतील हा प्रवास महिला नेतृत्वाला नवी दिशा देणारा ठरेल, असा विश्वास स्थानिक नागरिक व कार्यकर्त्यांकडून व्यक्त केला जात आहे.



