सरपंच ते जिल्हा परिषद ? वडापुरी–माळवाडी गटात पांडुरंग मारकड यांच्या उमेदवारीचा जोर.

इंदापूर,दि ३
- इंदापूर तालुक्यातील सर्वाधिक चर्चेत असलेल्या वडापुरी–माळवाडी जिल्हा परिषद गटात सध्या राजकीय हालचालींना वेग आला असून पांडुरंग मारकड यांच्या नावाला दिवसेंदिवस वाढता पाठिंबा मिळत आहे. येणाऱ्या दोन-तीन दिवसांत जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका जाहीर होऊन आचारसंहिता लागू होण्याची शक्यता असल्याने या गटातील वातावरण तापले आहे.
वडापुरी–माळवाडी जिल्हा परिषद गटातील प्रत्येक गावातून पांडुरंग मारकड यांनाच उमेदवारी देण्यात यावी, अशी ठाम मागणी पक्ष नेतृत्वाकडे करण्यात येत आहे. कार्यकर्ते, ग्रामस्थ तसेच विविध सामाजिक घटकांकडून मारकड यांच्या नावावर एकमत होत असल्याचे चित्र सध्या दिसून येत आहे.
पांडुरंग मारकड हे पडस्थळ गावचे विद्यमान सरपंच असून त्यांनी इंदापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी उपसभापती म्हणूनही काम पाहिले आहे. राजकारणाचा प्रदीर्घ अनुभव, विकासकामांचा ठसा आणि प्रत्येक गावातील लोकांशी असलेला थेट संवाद ही त्यांची प्रमुख ओळख मानली जाते. त्यामुळेच सर्वसामान्यांपासून कार्यकर्त्यांपर्यंत त्यांना मोठ्या प्रमाणावर पाठिंबा मिळत आहे.
मारकड हे नेहमीच ज्या पक्षात असतील त्या पक्षासोबत प्रामाणिकपणे व एकनिष्ठपणे काम करणारे नेते म्हणून ओळखले जातात. मात्र, पक्षाकडून उमेदवारी न मिळाल्यास अपक्ष म्हणूनही यंदाची निवडणूक कोणत्याही परिस्थितीत लढवण्याची त्यांची तयारी असल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत.
एकंदरीत, वडापुरी–माळवाडी जिल्हा परिषद गटात पांडुरंग मारकड यांच्या उमेदवारीभोवती राजकीय समीकरणे फिरू लागली असून येत्या काही दिवसांत या गटातील चित्र अधिक स्पष्ट होणार आहे.



