इंदापूर,दि.१७
- राज्यामध्ये विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाले आहे. त्यातच राज्यात महायुती मध्ये असलेला महादेव जानकर यांचा राष्ट्रीय समाज पक्ष स्वबळावर निवडणूक लढवणार असल्याची घोषणा झाली असून राष्ट्रीय समाज पक्ष इंदापूर विधानसभेची निवडणूक लढविणार असल्याचे निश्चित झाले आहे. इंदापूर विधानसभेसाठी राष्ट्रीय समाज पक्षाचा उमेदवार म्हणून तानाजी शिंगाडे यांना उमेदवारी फिक्स झाले असून त्यांच्या नावाच्या घोषणेची औपचारिक बाकी आहे.
विधानसभा निवडणुकीची घोषणा होऊन एक दिवस उलटत नाही तोच महाराष्ट्रात महायुतीला मोठा धक्का बसला आहे. राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते महादेव जानकर यांनी महायुतीतून बाहेर पडत राज्यात स्वबळावर निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे महादेव जानकर हे पश्चिम महाराष्ट्रात मोठी ताकद लावून बऱ्याच जागेवरती आपला उमेदवार देणार आहेत.
लोकसभेला महायुतीने आम्हाला एक जागा दिली होती, पण आमचा पक्ष मोठा झाला पाहिजे, आमच्या पक्षाचा मुख्यमंत्री झाला पाहिजे यासाठी आम्ही तयारी करत आहोत. राज्यातील २०० मतदारसंघांमध्ये प्रत्येक जागेसाठी तीन-तीन अर्ज आले आहेत. आता फक्त ८८ जागा राहिल्या आहेत. काही ठिकाणी आम्ही विजयी होऊ, काही ठिकाणी दोन नंबरची मते घेऊ. काही ठिकाणी दहा हजारांपेक्षा जास्त मते घेऊ असे जानकर यांचे म्हणणे आहे.
विशेष म्हणजे जानकर यांच्या पक्षाचा पश्चिम महाराष्ट्रातील पुणे ,सातारा, सांगली, सोलापूर आणि कोल्हापूर या जिल्ह्यात मोठा मतदार आहे. त्यातच बारामती लोकसभा मतदारसंघात जानकर यांना मानणारा मतदार मोठ्या प्रमाणात असून २०१४ मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत त्याचा प्रत्यय आला आहे. तसेच इंदापूर विधानसभा मतदारसंघात जानकर यांची ताकद सर्वांना अज्ञात आहे.
राष्ट्रीय समाज पक्ष तळागाळापर्यंत पोहोचवण्याचे काम इंदापूर तालुक्यातील राष्ट्रीय समाज पक्षाच्या कार्यकर्त्यांनी केली असून पक्षाची ताकद मोठ्या प्रमाणात वाढली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार व राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार या दोन पक्षांतर राष्ट्रीय समाज पक्षाचा इंदापूर तालुक्यात तिसरा नंबर लागतो. त्यामुळे महादेव जानकर यांच्या पक्षाचा इंदापूर विधानसभेसाठी उमेदवार मैदानात उतरणार असल्याचे जवळपास निश्चित झाले असून त्या उमेदवाराच्या नावाची घोषणा येणाऱ्या दोन-तीन दिवसात होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
तानाजी शिंगाडे यांनी पुणे जिल्हा नियोजन समिती वरती सदस्य म्हणून काम केले असून त्यांचा इंदापूर तालुक्यात दांडगा अनुभव आहे. तसेच त्यांचे सामाजिक क्षेत्रामध्ये चांगले काम असून इंदापूर विधानसभा मतदारसंघातून ते चांगले मताधिक्य घेऊ शकतील चर्चा सध्या सुरू आहे.