राजकीय

इंदापुरात राजकीय स्फोटाची चाहूल..!

सत्ता व विरोधकांतील शह-कटशहाची लढाई शिगेला; नेत्यांचे अस्तित्वच धोक्यात!

इंदापूर,दि.२५

  • इंदापूर तालुक्यातील राजकीय वातावरणात सध्या अक्षरशः वादळ उठले आहे. येणाऱ्या नगरपालिकेसह स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय समीकरणे जोरात हलू लागली आहेत. आघाडी–युतीच्या चर्चांना वेग आला असून, आतापर्यंत शत्रू मानले गेलेले काही नेते गुप्त बैठकींत एकमेकांच्या संपर्कात असल्याची माहिती बाहेर येताच, राजकीय वर्तुळात चांगलीच खळबळ उडाली आहे.

सत्ता मिळवण्यासाठी काही नेते ‘कोण कोणाच्या बाजूने?’ हेच जनतेच्या चर्चेचा विषय बनला आहे. पक्षांतर्गत नाराजी, मतदारसंघातील वैयक्तिक वैर आणि सत्तेसाठीची चढाओढ यामुळे इंदापूरचे राजकारण आता उकळत्या कढईसारखे तापले आहे. येत्या आठवड्यात नगरपालिकेसह पंचायत समिती व जिल्हा परिषद निवडणुकीतील उमेदवारांची नावे जाहीर होण्याची शक्यता असली तरी, त्या यादीत कोणाचा नंबर लागणार आणि कोणाचे नाव गाळले जाणार यावरून राजकीय वादळ उठण्याची शक्यता नाकारता येत नाही.

दरम्यान, काही नेते “माझं नाही चालणार तर कुणाचंही चालणार नाही!” या भूमिकेवर ठाम असल्याचे समजते. पक्ष नेतृत्वाने चुकीचा निर्णय घेतल्यास अनेकांची राजकीय कारकीर्द धोक्यात येईल, तर काही जण थेट विरोधी गोटात उडी मारण्याच्या तयारीत असल्याची कुजबुज सुरू आहे.

सत्ताधारी गटातील अंतर्गत भांडणं आणि विरोधकांची रणनीती यामुळे इंदापूर तालुक्यात “शह-कटशहा”चा खेळ सुरू झाला आहे. राजकीय अस्तित्व टिकवण्यासाठी काही नेते पाठीमागे गुप्त करार करत आहेत, तर काही नव्या संधीच्या शोधात आहेत.

एकूणच, इंदापूरचे राजकारण आता निर्णायक टप्प्यावर पोहोचले आहे. कुणाचं राजकीय भविष्य उजळणार आणि कुणाचं अस्तित्व संपणार, हे येत्या काही दिवसांत ठरणार आहे. तालुक्याच्या राजकीय रंगमंचावर आता ‘राजकीय भूकंपा’ची केवळ उलटगणती सुरू झाली आहे!

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!