राजकीय

निमगाव केतकी–शेळगाव जिल्हा परिषद गटात भाजपची सुप्त लाट; कमळ फुलण्याची दाट शक्यता!

इंदापूर,दि.५

  • निमगाव केतकी–शेळगाव जिल्हा परिषद गटात यावेळी भारतीय जनता पार्टीची जोरदार हवा असून संपूर्ण गटात ‘बदल’ हा कळीचा मुद्दा ठरत असल्याचे चित्र दिसून येत आहे. भाजपचे युवा नेते, माजी जिल्हा परिषद बांधकाम सभापती प्रवीण माने यांना मानणारा मोठा वर्ग या गटात सक्रिय असून त्याचा थेट फायदा भाजपला होत असल्याचे जाणकारांचे मत आहे.

प्रवीण माने यांचा सोनाई उद्योग समूह याच गटात कार्यरत असून या माध्यमातून हजारो युवकांना रोजगार उपलब्ध करून देण्यात आला आहे. रोजगारनिर्मितीमुळे तरुण वर्गात सोनाई परिवाराबाबत विशेष आपुलकी असून हा घटक निवडणुकीत निर्णायक ठरण्याची दाट शक्यता आहे.

दरम्यान, भाजपच्या जिल्हा परिषद उमेदवार दिपाली राऊत यांचे पती सचिन राऊत यांनी गेल्या अनेक वर्षांत सामाजिक कार्यातून मजबूत जनसंपर्क उभा केला आहे. त्यांच्या थेट संपर्कातील मतदार, अडचणी सोडवण्यासाठी केलेले प्रयत्न आणि सामाजिक बांधिलकीमुळे यावेळी ‘कमळ’ चिन्हाला मोठे मताधिक्य मिळू शकते, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.या गटात पंचायत समिती निवडणुकीसाठी निमगाव केतकी गणातून गोरख आदलिंग तर शेळगाव गणातून शुभम शिंगाडे हे भाजपच्या कमळ या चिन्हावर निवडणूक रिंगणात उतरले आहेत.

त्यामुळे जिल्हा परिषद व पंचायत समिती अशा दोन्ही पातळ्यांवर भाजपने मजबूत व्यूहरचना आखल्याचे दिसते.जातीय समीकरणे, मागील निवडणुकांचे निकाल आणि सध्याची राजकीय परिस्थिती पाहता, भारतीय जनता पार्टीला या गटात प्रथमच ऐतिहासिक विजय मिळवण्याची संधी असल्याचे राजकीय विश्लेषकांचे मत आहे.

राष्ट्रवादीसमोर अडचणी वाढल्या?

विशेष बाब म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या उमेदवार सोनाली तुषार जाधव यांच्या कुटुंबातील सदस्यांना गेल्या अनेक वर्षांपासून जिल्हा परिषद, पंचायत समिती तसेच विविध संस्थांमध्ये महत्त्वाची पदे मिळत आली आहेत. परिणामी, मतदारांमध्ये घराणेशाहीविरोधी नाराजी निर्माण झाल्याचे चित्र आहे, ज्याचा थेट फटका राष्ट्रवादीच्या उमेदवाराला बसू शकतो.

याशिवाय, विधानसभा निवडणुकीच्या काळात जाधव कुटुंबाने हर्षवर्धन पाटील यांच्यापासून अलिप्त होत राष्ट्रवादीमध्ये जाण्याची घेतलेली भूमिका आणि त्यानंतर हर्षवर्धन पाटील यांनी केलेली उघड टीका, यामुळे त्यांच्या समर्थकांची नाराजी अजूनही कायम आहे. त्यामुळे हर्षवर्धन पाटील यांचे कार्यकर्ते यावेळी जाधव कुटुंबासाठी मनापासून काम करतील का, हा प्रश्नही राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरत आहे.

एकूणच, बदलाची भावना, भाजपचा संघटनात्मक जोर आणि राष्ट्रवादीतील अंतर्गत नाराजी लक्षात घेता निमगाव केतकी–शेळगाव गटात कमळ फुलण्याची शक्यता अधिक बळावली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!