इंदापूर,दि.६ (जितेंद्र जाधव)
- भारतातील इतर राज्यांमधून येणाऱ्या थंड वाऱ्यांनी पुन्हा वेग पकडला आहे. त्यामुळे महाराष्ट्रातून गायब झालेली थंडी पुन्हा आली आहे. या थंड वाऱ्यामुळे इंदापूर तालुका गारठला आहे. या थंड वाऱ्यांमुळे इंदापूरसह आसपासच्या तालुक्यात किमान तापमानाचा पारा आणखी घसरला आहे. त्यामुळे तालुक्यात जागोजागी शेकोट्या पुन्हा पेटल्या आहेत.
पुणे जिल्ह्यांमध्ये किमान तापमान ११ अंश सेल्सिअसच्या खाली गेले आहे. जिल्हात पुढील ३ दिवस थंडी कायम राहणार आहे.हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, येत्या काही दिवसांत जिल्हात थंडीचा जोर आणखी वाढण्याची शक्यता आहे. तर संपूर्ण राज्यात तापमनान १ ते ३ अंशाच्या खाली जाण्याची शक्यता आहे. पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये व तालुक्यांमध्ये तापमान १० अंशाच्या खाली जात असल्याची नोंद झाली आहे. तर सोलापूर, सांगली,पुणे आणि अहिल्यानगर याठिकाणचे तापमान ८ अंशावर पोहचले आहे. तर राज्यातील इतर जिल्ह्यांमध्ये १० ते १२ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे.
थंडी वाढल्यामुळे आता राज्यात पुन्हा शेकोट्या पेटू लागल्या आहेत. थंडी वाढल्यामुळे नागरिक स्वयटर आणि जाड कपडे घालताना दिसत आहेत. सध्या राज्यात सकाळी गारठा आणि दिवसा कडाक्याचे ऊन पाहायला मिळत आहे.
सध्या भारतामधील उत्तरेकडील राज्यातही थंडी प्रचंड वाढली आहे. अनेक राज्यात धुक्यांची दाट चादर पसरली आहे. हिमालयाच्या पायथ्याशी असलेल्या राज्यात पाऊस आणि हिमवृष्टी होत आहे. काश्मीरमध्ये बर्फावृष्टीचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. त्यामुळेच उत्तरेकडील राज्यात थंडीचा कडाका वाढला आहे.