भिगवण प्रकरणाच्या निषेधार्थ आज इंदापूर बंद.
सकल हिंदू समाजाचा कडकडीत निर्णय; दुपारी १ वाजेपर्यंत व्यवहार ठप्प.

इंदापूर,दि २३
- भिगवण येथे घडलेल्या कथित लव्ह जिहाद प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर सकल हिंदू समाजाकडून तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे. या घटनेच्या निषेधार्थ आज दि. २३ रोजी इंदापूर दुपारी १ वाजेपर्यंत कडकडीत बंद पाळण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
यासंदर्भात बारामती येथे सकल हिंदू समाजाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना नवनाथ पडळकर, प्रदेश सचिव, भारतीय जनता पक्ष यांनी बंदची माहिती दिली.
बैठकीत भिगवण प्रकरणातील आरोपींवर पोक्सो कायद्यान्वये कठोर कारवाई करावी, राज्यात धर्मांतरणविरोधी कायदा तातडीने लागू करावा, तसेच या घटनेमागील मुख्य सूत्रधारावर मोक्का (महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी प्रतिबंधक कायदा) अंतर्गत कारवाई करावी, अशी ठाम मागणी करण्यात आली.
तसेच, पोलिस प्रशासनाने अपेक्षित ती कठोर पावले उचलली नाहीत, तर तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडले जाईल, असा इशाराही या बैठकीत देण्यात आला. कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, मात्र दोषींवर कारवाई होईपर्यंत लढा सुरूच राहील, असा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.
अशा प्रकारच्या घटना राज्यात पुन्हा घडू नयेत, यासाठी समाजप्रबोधन व जनजागृती मोहीम राबविण्यात येणार असल्याचेही सांगण्यात आले.
दरम्यान, या संपूर्ण प्रकरणात देवेंद्र फडणवीस यांनी वैयक्तिक लक्ष घालावे, अशी मागणी सकल हिंदू समाजाच्या वतीने करण्यात येणार आहे.
आजच्या बंद दरम्यान नागरिकांनी शांतता राखून सहकार्य करावे, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.



