शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च कमी करून त्यांच्या उत्पन्नात वाढ करण्यासाठी प्रयत्न करणार – कृषिमंत्री माणिकराव कोकाटे.
इंदापूर कृषी महोत्सव २०२५' चे उद्घाटन संपन्न.
इंदापूर, दि.२३
- शेतकऱ्यांचे जीवनमान अधिकाधिक समृद्ध करण्याच्या दृष्टीने कृषी विभागामार्फत शेतकऱ्यांना विविध योजनांचा लाभ देण्यासह नवनवीन तंत्रज्ञान उपलब्ध करून दिले जाईल, असे प्रतिपादन कृषीमंत्री ॲड. माणिकराव कोकाटे यांनी केले. शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च कमी करून त्यांच्या उत्पन्नात वाढ करण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील, असेही ते म्हणाले.कृषी उत्पन्न बाजार समितीच्यावतीने आयोजित ‘इंदापूर कृषी महोत्सव २०२५’ च्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.
ॲड.कोकाटे म्हणाले, राज्यातील शेतकरी प्रगतशील आहेत. शेतकऱ्यांनी शेतीत नवनवीन तंत्रज्ञान, उत्कृष्ट बी-बियाण्याचा वापर केला पाहिजे. कृषी क्षेत्रात चांगले काम करणारे शेतकरी, कंपन्यांना प्रोत्साहन देण्याकरीता राज्य शासनावतीने सहकार्य करण्यात येईल. केंद्र व राज्यशासन मिळून शेतकरी सुरक्षित आणि संरक्षित होण्यासाठी कृषी विभागाच्यावतीने विविध लोकल्याणकारी निर्णय घेण्यात येतील. आगामी काळात नवीन योजना राबविण्यासोबतच आवश्यकतेनुसार जुने कायदे व योजनेतही बदल करण्यात येतील.
तंत्रज्ञानाचा वापर करुन शेतकऱ्यांना कृषी विभागाच्या विविध योजनांचा पारदर्शक पद्धतीने लाभ देण्याचा विचार करण्यात येत आहे. प्रत्येक गावात पर्जन्यमापक यंत्र बसविण्याचा निर्णय घेण्यात आला असून यामुळे शेतकऱ्यांना पर्जन्यमान, तापमान आदी घटकांची माहिती तात्काळ मिळण्यास मदत होणार आहे. कृषी विषयक ज्ञान शेतकऱ्यांना उपलब्ध करुन व्हावे म्हणून मोठ्या प्रमाणावर जनजागृतीसाठी प्रयत्न करण्यात येणार आहेत.
कृषी उत्पन्न बाजार समितीच्यावतीने आयोजित ‘इंदापूर कृषी महोत्सव २०२५’ च्या माध्यमातून नवनवीन तंत्रज्ञान, पीकपद्धती तसेच कृषी क्षेत्रातील ज्ञान गावातील शेतकऱ्यांपर्यंत पोहचविण्याकरीता प्रयत्न करण्यात आला आहे; आगामी काळात अशा प्रकारचे प्रदर्शन राज्यभर आयोजित करण्याकरीता प्रयत्न करण्यात येतील. केवळ महिलांकरीता अशा प्रकारचे प्रदर्शन आयोजित करुन कृषी विषयक ज्ञान, नवीन तंत्रज्ञान, अत्याधुनिक पीकपद्धती आदींबाबत माहिती देण्यात येईल.
उमेद अभियान तसेच महिला बचत गटाच्या माध्यमातून तयार करण्यात येणाऱ्या उत्पादन विक्रीकरीता बाजारपेठ उपलब्ध करुन देण्याचा प्रयत्न आहे. त्यासाठी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात जागा उपलब्ध करुन देण्यासाठी प्रयत्न करण्यात येईल, असेही ॲड.कोकाटे म्हणाले.
आप्पासाहेब जगदाळे यांच्यामुळे इंदापूर कृषी उत्पन्न बाजार समिती ला अच्छे दिन….!!
इंदापूर कृषी उत्पन्न बाजार समिती ही देशांमध्ये नावलौकिक असलेली बाजार समिती आहे. या बाजार समितीच्या माध्यमातून प्रत्येक वर्षी कृषी प्रदर्शनाचे आयोजन केले जाते. या प्रदर्शनात देश विदेशातील नामांकित जातीचे घोडे खरेदी विक्रीसाठी येत असतात. या घोडेबाजारामुळे देशात इंदापूर कृषी उत्पन्न बाजार समितीला तत्कालीन कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती व विद्यमान संचालक आप्पासाहेब जगदाळे यांनी नावलौकिक मिळवून दिले आहेत.