राजकीय

हर्षवर्धन पाटील यांचे कट्टर समर्थक हनुमंत जाधव निवडणूक लढवण्यास तयार मात्र, पक्ष नेतृत्वाच्या आदेशाची प्रतीक्षा.

बिजवडी-पळसदेव गटात निवडणूक लढण्याची तयारी.

इंदापूर,दि २४

  • बिजवडी–पळसदेव जिल्हा परिषद गटात माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांचे कट्टर समर्थक हनुमंत जाधव यांनी येणाऱ्या निवडणुकीसाठी आपली तयारी स्पष्ट केली आहे. पक्ष नेतृत्वाने आदेश दिल्यास जिल्हा परिषद अथवा पंचायत समितीची निवडणूक लढवण्यास आपण सज्ज असल्याचे संकेत त्यांनी दिले आहेत.

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा बिगुल वाजले असून नगरपालिकेच्या निवडणुकीनंतर आता महानगरपालिकेच्या निवडणुका जाहीर झाल्या आहेत. त्याच पार्श्वभूमीवर येत्या दोन-तीन दिवसांत जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकांची घोषणा होऊन आचारसंहिता लागू होण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे आचारसंहिता लागू होण्यापूर्वीच पुणे जिल्हा परिषदेसाठी, विशेषतः इंदापूर तालुक्यात राजकीय हालचालींना प्रचंड वेग आला आहे.

इंदापूर तालुक्यातील बिजवडी–पळसदेव जिल्हा परिषद गट कोण लढवणार, याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागून राहिले आहे. हा गट नेहमीच राजकीयदृष्ट्या महत्त्वाचा मानला जात असून येथे उमेदवारी मिळवण्यासाठी विविध पक्षांतील इच्छुकांनी जोरदार तयारी सुरू केली आहे. पक्षांतर्गत बैठका, नेत्यांच्या भेटीगाठी, कार्यकर्त्यांची चाचपणी आणि सामाजिक समीकरणांची जुळवाजुळव सुरू असल्याचे चित्र दिसत आहे.

कर्मयोगी शंकरराव पाटील सहकारी साखर कारखान्याचे विद्यमान संचालक असलेले हनुमंत जाधव गेल्या दहा वर्षांपासून कारखान्याच्या कार्यात सक्रिय आहेत. सुशिक्षित, अभ्यासू आणि स्वच्छ प्रतिमेचे राजकारणी म्हणून त्यांची परिसरात ओळख असून, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांचे ते विश्वासू व कट्टर समर्थक मानले जातात.

बिजवडी–पळसदेव जिल्हा परिषद गटात हनुमंत जाधव यांच्या नावाला कार्यकर्ते आणि नागरिकांकडून मोठी पसंती मिळत आहे. विशेष म्हणजे कालठण नं. १ ग्रामपंचायतीवर त्यांचे ठोस वर्चस्व असून, स्थानिक पातळीवरील संघटन कौशल्य त्यांची जमेची बाजू ठरत आहे.

या गटातील प्रत्येक गावाशी त्यांचा थेट व सलोख्याचा संपर्क आहे. सामान्य नागरिकांच्या अडचणी सोडवण्यासाठी ते नेहमीच पुढाकार घेत असल्याने लोकांमध्ये त्यांच्याविषयी विश्वासाचे वातावरण निर्माण झाले आहे.

येत्या काळात विरोधी पक्षाकडून कोणताही उमेदवार असला, तरी पक्ष नेतृत्वाने आदेश दिल्यास निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची पूर्ण तयारी हनुमंत जाधव यांनी दर्शवली आहे. त्यामुळे बिजवडी–पळसदेव गटातील राजकीय घडामोडींना वेग येण्याची चिन्हे स्पष्ट दिसत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!