भटक्या व विमुक्त जाती जमातीसाठीच्या योजनांचा तत्काळ भटक्या समाजाला लाभ द्या अन्यथा मंत्रालयावर मोर्चा काढू:- महेंद्र भोसले.
इंदापूर तहसील कचेरी बाहेर भटक्या विमुक्त समाजाचे उपोषण.

इंदापूर,दि.१४
- राज्यातील भटक्या व विमुक्त जाती जमाती अजूनही अन्न, वस्त्र, निवारा, शिक्षण, आरोग्य व जात प्रमाणपत्र, आधार कार्ड मिळत नसल्याने शासकीय योजना पासून आजही वंचित आहे. अनेक वेळा शासन वेगवेगळ्या योजना भटक्यांसाठी जाहीर करते मात्र, स्थानिक पातळीवरती त्याची अंमलबजावणी होत नाही. उलट स्थानिक अधिकाऱ्यांची भटक्यांच्या योजना राबवण्याबाबत उदासीनता असल्याने ते पोहोचू शकत नाही. त्यामुळे तात्काळ प्रशासनाने याची दखल घेत भटक्यांसाठीच्या योजनांची अंमलबजावणी करावी अन्यथा महाराष्ट्र राज्याच्या मंत्रालयावर हजारो भटक्या व विमुक्त जाती-जमातीतील लोकांसहित मोर्चा काढू असा इशारा भटक्या समाजाचे नेते महेंद्र सिद्राम भोसले यांनी प्रशासनाला दिला आहे.
भोसले म्हणाले की राज्य सरकारच्या माध्यमातून अनेक वेळा भटक्या विमुक्त समाजातील लोकांसाठी विविध योजना जाहीर केल्या जातात. राज्य शासनातील अनेक मंत्री भटक्या समाजाच्या उन्नतीसाठी काम करतात. मात्र, स्थानिक पातळीवरू अधिकारी या योजना राबवण्याबाबत उदासीनता दाखवतात. तसेच स्थानिक पातळीवरील ग्रामसेवक, तलाठी, महसूल विभागाचे कर्मचारी या योजनेकडे गांभीर्याने पाहत नाहीत अथवा राबवत नाहीत हे वास्तव आहे. या योजना न राबवल्यामुळे भटक्या समाजातील लोकांना याचा लाभ मिळत नाही ते या योजनांपासून कायम वंचित राहतात. हा भटक्यास विमुक्त जाती जमातीतील लोकांवरती स्थानिक अधिकाऱ्यांकडून मोठा अन्याय होत आहे आणि तो यापुढे सहन केला जाणार नाही.
तसेच भोसले पुढे म्हणाले की राज्य शासनाने तात्काळ भटक्या विमुक्त समाजातील लोकांसाठी जात प्रमाणपत्राबाबत शिबिर आयोजित करावीत,१९५२ चा गुन्हेगार अधिनियम रद्द करून केंद्राकडे प्रस्ताव सादर करावा, आधार कार्ड ऐवजी पर्याय कागदपत्राची मुभा मिळावी, तात्पुरते रेशन कार्ड न देता कायम रेशन कार्ड द्यावे.तसेच सरकारी व खाजगी जमिनीवर वास्तव्य असलेल्या कुटुंबाचे सर्वेक्षण करून वास्तव्यास असलेल्या ठिकाणांची जागा त्यांना कायमची राहण्यास द्यावी, भटक्या विमुक्त समाजासाठी राज्य शासनाने स्वतंत्र योजना व स्वतंत्र बजेट देण्यात यावे, भटक्यांच्या योजना स्थानिक पातळीवर राबवण्यासाठी एक विशिष्ट अधिकारी नेमणूक करून त्यांच्याकडे ही जबाबदारी देण्यात यावी.तसेच अत्याचार प्रतिबंधक व संरक्षण समितीची स्थापना करून मासिक बैठक घेण्यात यावी तसेच शिक्षण अन्न वस्त्र निवारा या मूलभूत गरजा कायम मिटवण्यासाठी केंद्र व राज्य शासनाने पुढाकार घेऊन भटक्यांच्या समस्या दूर कराव्यात.
जर आमच्या वरील मागण्या मान्य न झाल्यास राज्य शासनाला याचा गंभीर परिणाम भोगावे लागेल आणि आमचा भटका विमुक्त समाज हा मुंबई मधील मंत्रालयाबाहेर मोर्चा काढून न्याय मिळेपर्यंत मंत्रालयाबाहेरून हटणार नाही.
महेंद्र सिद्राम भोसले. (भटक्या समाजाचे नेते)
यावेळी भटक्या समाजाचे नेते शिवाजीराव आहेर, सचिन वाघमोडे, ज्ञानेश्वर भोई, सुनील वायकर, छायाताई पासगे, धनीराम नगरे, तानाजी बोरकर, नीता साळुंखे, अलका साळुंखे, आरती पवार, सपना पवार, ताराबाई पवार, सोमनाथ भोसले उपस्थित होते.



