बोरी येथील वृद्ध महिलेला न्याय न मिळाल्याने अमरण उपोषणाला सुरुवात.
कारवाई होईपर्यंत उपोषण स्वळावरून न उठण्याचा निर्धार.
इंदापूर,दि २९
- प्रशासनाने आदेश देऊनही स्वतःची जमीन पिकवता येत नाही. जमीन पिकवण्यासाठी प्रयत्न केला तर अडथळा निर्माण होत असल्याकारणाने इंदापूर तालुक्यातील बोरी येथील एक विधवा वृद्ध महिला इंदापूर तहसील कचेरी बाहेर अमरण उपोषणाला बसली आहे.
बोरी येथील सुनंदा नामदेव खरात यांनी इंदापूर येथील दिवाणी न्यायालयात स्वतःच्या मिळकतीचा ताब्यासाठी दावा दाखल केला होता. कोर्टाने सदर मिळकतीचा दावा सुनंदा नामदेव खरात यांच्या बाजूने मंजूर केला. त्यानंतर सन २००७ मध्ये सदर अर्जदार सुनंदा खरात यांच्या दाव्यानुसार त्यांना सदर क्षेत्राचा ताबा घेतेवेळी संरक्षण देण्याचे आदेश देखील दिले होते.
मात्र तक्रारदार यांचे विरोधक व प्रतिवादी असणाऱ्या व्यक्तीने हरकत व अडथळा निर्माण केल्याने पुन्हा अर्जदार यांना इंदापूर तहसीलदार यांनी ताबा घेतेवेळी पोलीस संरक्षण देण्याचा आदेश दिला. त्यानंतरच्या कालखंडात मंडळ अधिकारी सणसर व वालचंदनगर पोलीस स्टेशनचे कर्मचारी तसेच उपाधीक्षक भूमि अभिलेख यांचे कर्मचारी यांच्या उपस्थित ताबा देण्यासाठी तारीख नेमली होती. परंतु त्यावेळी सदर प्रतिवादी यांनी हरकत घेत अडथळा निर्माण केल्यामुळे ताब्याची प्रक्रिया पूर्ण होऊ शकली नाही. तसेच त्यानंतर देखील ताब्याची तारीख नेमलेली होती. परंतु ताब्याची कारवाई अद्याप पर्यंत पूर्ण झालेली नाही.
त्यामुळे अर्जदार सुनंदा नामदेव पवार या निराधार व विधवा स्त्री असल्यामुळे त्यांना जीवन जगण्यासाठी तर कोणत्याही साधन नाही किंवा उत्पन्न नाही. सदरचा ताबा न दिल्यामुळे सुनंदा खरात यांचे अतोनात नुकसान झाल्यामुळे तसेच वेळोवेळी प्रशासनाला विनंती करूनही त्यांच्या मागणीकडे व कारवाईकडे दुर्लक्ष केल्याने त्यांनी इंदापूर तहसील कचेरी बाहेर अमरण उपोषण सुरू केले आहे. जोपर्यंत प्रशासन कारवाई करत नाही तोपर्यंत उपोषण स्थळावरून उठणार नसल्याचा त्यांनी निर्धार केला आहे.