काँग्रेस म्हणजे मुस्लिम आणि मुस्लिम म्हणजे काँग्रेस”; भाजप आमदार सुरेश धस यांच्या वक्तव्याने वादळ.

इंदापूर,दि ६
- महाराष्ट्रात तसेच पुणे जिल्ह्यात स्थानिक स्वराज्य संस्था, पंचायत समिती व जिल्हा परिषद निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे. या पार्श्वभूमीवर इंदापूर तालुक्यातील वडापुरी–माळवाडी व काटी–लाखेवाडी जिल्हा परिषद गटातील उमेदवारांच्या प्रचारासाठी भाजपच्या वतीने वडापूरी येथे जाहीर सभा पार पडली. या सभेत काँग्रेस म्हणजे मुस्लिम आणि मुस्लिम म्हणजे काँग्रेस आ.सुरेश धस यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्याने वादळ निर्माण झाले आहे.
या सभेला भाजपचे ज्येष्ठ नेते, माजी राज्यमंत्री तथा आष्टी विधानसभा मतदारसंघाचे आमदार सुरेश धस आणि दौंडचे आमदार राहुल कुल यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच इंदापूर तालुक्यातील भाजपचे नेते प्रवीण माने, प्रदीप गारटकर यांच्यासह दोन्ही गटांतील उमेदवार व पदाधिकारी उपस्थित होते.
वडापुरी येथील सभेत मार्गदर्शन करताना आमदार सुरेश धस यांनी मुस्लिम समाजाबाबत वादग्रस्त वक्तव्य करत “काँग्रेस म्हणजे मुस्लिम आणि मुस्लिम म्हणजे काँग्रेस” असे विधान केल्याने मोठा वाद निर्माण झाला आहे. या वक्तव्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून, मुस्लिम समाजातील तरुण व मतदारांनी तीव्र निषेध नोंदवण्यास सुरुवात केली आहे.
या वक्तव्यामुळे राजकीय वातावरण तापले असून, चालू असलेल्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीवर याचा विपरीत परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. राजकीय वर्तुळात या घटनेचे पडसाद उमटत असून, संबंधित वक्तव्यावर भाजपकडून स्पष्टीकरण दिले जाणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.



