इंदापूर तालुक्यातील बोगस मतदार उघड…?
१७ हजार पेक्षा अधिक बोगस मतदार असल्याचा याचीकाकर्त्यांचा दावा.

इंदापूर,दि.२३
- काँग्रेस नेते आणि लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी थेट निवडणूक आयोगाला प्रश्न उपस्थित करत. लाखो मतदार बोगस असल्याचा दावा काही दिवसांपूर्वी केला होता. त्याच धर्तीवरती आता पुणे जिल्ह्यातील इंदापूर मध्ये असाच मतदारांचा बोगस प्रकार समोर आला आहे.
इंदापूर तालुक्यातील निरनिमगाव येथील सरपंच प्रताप सर्जेराव पाटील यांनी त्यांच्याच गावातील बोगस मतदार शोधून काढल्याचा धक्कादायक पुराव्यानिशी खुलासा त्यांनी दिला आहे. निरनिमगाव सारख्या छोट्याशा गावात जवळपास २२० बोगस मतदार आढळून आल्याचा दावा पाटील यांनी केला आहे. या 220 बोगस मतदारांनी लोकसभा व विधानसभा निवडणुकीत दोन्हीही ठिकाणी मतदान केल्याचा पुरावा त्यांच्याकडे आहे.
यासंदर्भात तत्कालीन तहसीलदार श्रीकांत पाटील यांनी या गावातील ७८ बोगस मतदान आढळून आल्याचा आदेश दिला होता. मात्र त्यांची सही आदेशावर झाली नाही त्यानंतरच्या कालखंडात श्रीकांत पाटील यांची बदली झाली.पण मात्र नव्याने आलेले तहसीलदार जीवन बनसोडे यांनी याकडे काना डोळा केल्याचा थेट आरोप पाटील यांनी केला आहे. त्यांच्या निरनिमगाव या गावात सातारा जिल्ह्यातील माण तालुक्यातील वरकुटे,मलवडी येथील २४, इंदापूर तालुक्यातील कळब येथील २८, कालठण नंबर १ येथील ०६, बोरी येथील ०१ तसेच आटपाडी येथील ०३,कोंडीज येथील ०१, उरुळी देवाची येथील ०४, बारामती तालुक्यातील पिंपळी व लिमटेक ०४, तसेच निरनिमगावातील कमी वय असून देखील ४० युवकांनी मतदान केले आहे.
तसेच या निरनिमगाव गावामध्ये रहिवासी नसलेले असे एकूण १०२ नावे निदर्शनास आलेली आहेत. यासंदर्भात ते लोकसभेच्या निवडणुकीपासून बोगस मतदारांबाबत लढा देत आहेत. पाटील यांच्या माहितीनुसार इंदापूर तालुक्यात १७ हजार पेक्षा अधिक बोगस मतदार असून विशेष बाब म्हणजे लाखेवाडी या गावात परराज्यातील मतदारांची नोंद असल्याचा दावा व सत्यप्रत त्यांनी माध्यमांना दाखवली आहे.
राहुल गांधी यांच्या निवडणूक आयोगाच्या बोगस मतदारांच्या बॉम्बस्फोटानंतर इंदापूर मध्ये आता बोगस मतदारांचा मुद्दा समोर आल्याने हा मुद्दा महाराष्ट्रभर चर्चेला जाणार असून यात सत्यता जर आढळली तर इंदापूर तालुक्याची निवडणूक पुनश्च होण्याचे शक्यता वर्तवली जात आहे.



