इंदापूरमध्ये ‘दोन्ही राष्ट्रवादी’ एकत्र! आज अधिकृत घोषणेची शक्यता?

इंदापूर,दि.१६
- इंदापूर तालुक्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मोठी राजकीय घडामोड समोर येत आहे. पुणे जिल्हा परिषद निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्यानंतर इंदापूर पंचायत समितीच्या निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागले असून, याठिकाणी राजकीय समीकरणे पूर्णपणे बदलताना दिसत आहेत.
राजकीयदृष्ट्या अत्यंत महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या इंदापूर पंचायत समिती निवडणुकीत आतापर्यंत एकमेकांचे कट्टर विरोधक असलेले नेते एकत्र निवडणूक लढवण्याची शक्यता निर्माण झाली आहे. विशेष म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट ही निवडणूक आघाडी करून लढवणार असल्याची खात्रीशीर माहिती सूत्रांकडून मिळत आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, नुकतीच राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार तसेच इंदापूरमधील शरद पवार गटाचे वरिष्ठ नेते यांच्यात महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीत इंदापूर पंचायत समिती व जिल्हा परिषद निवडणुका आघाडी करून लढण्याचा निर्णय झाल्याची चर्चा आहे.
या निर्णयाबाबत आजच इंदापूर तालुक्यातील दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांच्या पदाधिकाऱ्यांना अधिकृत संदेश देण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे येत्या निवडणुकीत इंदापूर तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस (दोन्ही गट) विरुद्ध भाजप असा थेट राजकीय सामना पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे.
या अनपेक्षित राजकीय युतीमुळे इंदापूरच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली असून, आज होणाऱ्या अधिकृत घोषणेकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे.



