इंदापूर पोलिसांच्या कारवाईच्या भीतीने अवैध धंदे बंद, वाळू माफिया गायब, शहरात शांततेचे वातावरण.

इंदापूर,दि १६
- इंदापूर शहर व तालुक्यात पोलीस प्रशासनाने राबवलेल्या कडक आणि सातत्यपूर्ण कारवाईमुळे कायदा-सुव्यवस्थेचे चित्र पूर्णपणे बदलले असून, अवैध धंदे, वाळू माफियांचे गैरप्रकार, दादागिरी व गुन्हेगारी प्रवृत्तीवर मोठा आळा बसला आहे. नागरिकांमध्ये समाधान तर गुन्हेगारांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
मागील काळात इंदापूर पोलीस स्टेशनच्या कार्यक्षेत्रात अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या अवैध व्यवसायांवर पोलीस प्रशासनाने थेट कारवाईचा बडगा उगारला. या कारवाईमुळे अवैध धंदे पूर्णपणे बंद पडले असून, कायद्याचा धाक प्रभावीपणे निर्माण झाला आहे.
पोलीस निरीक्षक विलास नाळे यांनी कार्यभार स्वीकारल्यानंतर उजनी परिसरात सुरू असलेल्या चोरट्या वाळू उपशावर सातत्याने कारवाई करण्यात आली. परिणामी, आज उजनी परिसरात अवैध वाळू उत्खनन शंभर टक्के बंद झाल्याचे चित्र आहे. वाळू माफिया नामशेष झाले असून, महसूल व पर्यावरणाला होणारे नुकसान थांबले आहे.
तसेच इंदापूर पोलीस स्टेशनच्या हद्दीत दादागिरी, दमदाटी, भांडणतंटे करणाऱ्या समाजकंटकांवर कडक कारवाई करण्यात आली आहे. त्यामुळे परिसरात शांतता प्रस्थापित झाली असून, सामान्य नागरिकांना दिलासा मिळाला आहे.शहर व परिसरात मोकाट फिरणाऱ्या रोड रोमिओंवरही पोलीस प्रशासनाने ठोस कारवाई केल्याने महिला व शिक्षण घेणाऱ्या मुलींमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे.
रात्रंदिवस पेट्रोलिंग, तक्रारींवर तात्काळ कारवाई, संवेदनशील प्रकरणांत कठोर निर्णय आणि जनतेशी थेट संवाद—या सर्व गोष्टींमुळे पोलीस प्रशासनाचं काम कौतुकास्पद ठरत आहे. कायद्याची अंमलबजावणी कागदावर नाही, तर प्रत्यक्षात दिसतेय.
एकूणच, पोलीस निरीक्षक विलास नाळे यांच्या कार्यकाळात इंदापूर पोलीस स्टेशनच्या कार्यक्षेत्रातील गुन्हेगारीचे प्रमाण कमी झाले असून, पोलीस प्रशासनावर नागरिकांचा विश्वास अधिक दृढ झाला आहे. आज इंदापूरमध्ये कायदा-सुव्यवस्थेचा कडक अंमल दिसून येत असून, पोलीस प्रशासनाच्या कार्याची सर्वत्र प्रशंसा होत आहे.



