इंदापुरात अंगापेक्षा मोठा झाला भोंगा;पदाचारी मार्गापेक्षा रस्ता होतोय का छोटा.
सदर रस्त्याने भविष्यात होणाऱ्या वाहतूक कोंडीला कंत्राटदार व अधिकारी जबाबदार राहणार का..?

इंदापूर,दि.२४
- इंदापूर शहरामध्ये सध्या एका रस्त्याची जोरात चर्चा सुरू असून तो शहरातील “आखरी मार्ग’ म्हणून ओळखला जाणारा रस्ता सध्या सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. बाबा चौक ते स्मशानभुमी पर्यंतच्या रस्त्याचे काम सुरू असून या रस्त्यापेक्षा पदाचारी मार्गच मोठा केल्याने “आंगापेक्षा मोठा झाला भोंगा’ या मराठी भाषेतील शब्दप्रयोगाप्रमाणे रस्त्याचे काम सुरू आहे. भविष्यात या रस्त्यावर वाहतूक कोंडी होऊन मोठे अपघात होण्याची शक्यता आहे त्यामुळे या सर्व गोष्टींना संबंधित कंत्राटदार व अधिकारी जबाबदार धरले जाणार का असा प्रश्न सामान्य इंदापूरकर उपस्थित करत आहेत.
इंदापूर शहरामध्ये लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नागरी वस्ती सुधार योजना २०२४-२०२५ अंतर्गत बाबा चौक ते भार्गराम बगीचा मार्गाने थेट स्मशानभुमी पर्यंत १ कोटी ८९ लाख ५२ हजार रुपयाचे रस्त्याचे काम सुरू आहे. या रस्त्यावर कायम रहदारी असल्यामुळे सदरचा रस्ता मोठा होणे आवश्यक होते. मात्र,या रस्त्यापेक्षा पदाचारी मार्गच मोठा करण्यात आल्याने नेमका रस्त्याचे काम सामान्य जनतेसाठी की कंत्राटदाराच्या फायद्यासाठी असा संशय इंदापूरच्या जनतेमध्ये निर्माण झाला आहे.
विशेष बाब म्हणजे सदरच्या रस्त्याला एकाच बाजूने पदचारी मार्ग करण्यात आला असून दुसऱ्या बाजूला भार्गराम बगीच्या असून तो भाग खोल असल्याने त्या ठिकाणी भविष्यात अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे सदरच्या रस्त्यावर एका बाजूने पदचारी मार्ग मोठा बनवण्याचा घाट कोणी व का घातला हा प्रश्न अनुत्तरीत राहिला आहे.
“शासनाचा पैसा हा झाडाला लागतो..? त्यामुळे तो कसाही ओरबडला तरी चालतो. सरकारची तिजोरी म्हणजे आपल्या बापाची जहागीरदारी, कशी ही उधळपट्टी केली तरी चालते ही मानसिकता ठराविक कंत्राटदारांची झाल्याने “होऊदे खर्च’ अशी भूमिका सध्या काही गाव पुढाऱ्यांच्या मदतीने संबंधित कंत्राटदारांची झाल्याची दिसत आहे.
त्यामुळे इंदापूर शहरात बाबा चौक ते स्मशानभूमी मार्गावर चालू असलेल्या रस्त्यावर रस्त्यापेक्षा मोठा झालेला पदाचारी मार्गाचे काम तात्काळ थांबून तो पदाचारी मार्ग लहान करत दोन्ही बाजूने करण्यात यावा. रस्त्यावर होत असलेली अनावश्यक खर्चाची उधळपट्टी थांबवून दर्जेदार व टिकाऊ रस्ता तयार करण्यात यावा व संबंधित कंत्राटदाराला तात्काळ पदचारी मार्ग लहान करण्याचे आदेश संबंधित विभागाने द्यावेत अन्यथा इंदापूर शहरात भविष्यात जन आंदोलन उभे राहू शकते.



