मुंबई, दि .४
- मुंबईतल्या घणसोली परिसरात एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. इथे दोन जणांनी एका पोलीस कर्मचाऱ्याची धावत्या लोकलमध्ये हत्या केली आहे. आरोपी एवढ्यावरच थांबले नाहीत. तर त्यांनी हत्येनंतर संबंधित पोलीस कर्मचाऱ्याचा मृतदेह समोरून येणाऱ्या धावत्या लोकल समोर फेकला.
हा अपघात भासावा म्हणून आरोपींनी असं केलं होतं. मात्र मृत पोलिसाच्या गळ्याभोवती व्रण आढळून आल्यानंतर या प्रकरणाचं गूढ उलगडलं आहे. याप्रकरणी पोलिसांनी दोन अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल केला असून त्यांचा शोध सुरू केला आहे.
विजय रमेश चव्हाण असं हत्या झालेल्या ४२ वर्षीय पोलीस कर्मचाऱ्याचं नाव असून ते पनवेल रेल्वे पोलीस ठाण्यात हेड कॉन्स्टेबल म्हणून काम करतात. घटनेच्या दिवशी मंगळवारी चव्हाण यांची साप्ताहिक सुट्टी होती. बुधवारी पहाटे साडे पाचच्या सुमारास चव्हाण यांचा मृतदेह घणसोली ते रबाळे रेल्वे स्टेशनच्या मध्ये आढळून आला होता. आरोपींनी ठाण्याहून वाशीच्या दिशेनं जाणाऱ्या ट्रेन समोर चव्हाण यांचा मृतदेह फेकून दिला होता.
याबाबतची माहिती मोटरमनने आरपीएफ आणि वाशी रेल्वे पोलिसांना दिल्यानंतर रेल्वे पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. घटनास्थळाची पाहणी केल्यानंतर मृत व्यक्ती दुसरी तिसरी कुणी नसून पनवेल पोलीस ठाण्यात काम करणारे हेड कॉन्स्टेबल विजय चव्हाण असल्याचं समोर आलं. तसेच त्यांच्या गळ्यावर गळा दाबून हत्या केल्याच्या खुणा आढळल्या. तसेच त्यांचं शवविच्छेदन केलं असता त्यांची गळा दाबून हत्या केल्याचं समोर आलं.
दोन जणांनी धावत्या लोकलमध्ये विजय चव्हाण यांची हत्या केल्यानंतर त्यांचा अपघातात मृत्यू झाला आहे, हे भासवण्यासाठी त्यांना लोकलसमोर ढकलून दिल्याचं प्राथमिक तपासात समोर आलं आहे. याप्रकरणी पोलिसांनी दोन आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला आहे. आरोपींचा शोध सुरू आहे.