माझी लाडकी बहिण योजनेसह सर्व कल्याणकारी योजना पुढील पाच वर्षे सुरू राहतील:- उपमुख्यमंत्री अजित पवार.
अजित पवारांचे साताऱ्यात जोरदार शक्तिप्रदर्शन; उसळला जनसागर.
सातारा, दि ७
- उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार यांची जनसन्मान यात्रा आज सातारा जिल्ह्यातील वाई विधानसभा मतदारसंघात पोहोचली. हा परिसर राष्ट्रवादीच्या समर्थकांनी गजबजला होता. अजित पवार यांचे हजारो महिला व युवकांनी स्वागत केले. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर वाईतील यात्रेचे रुपांतर राष्ट्रवादीच्या जोरदार शक्तिप्रदर्शनात झाले. वाई विधानसभा मतदारसंघातील विविध विकासकामांचे उद्घाटन आणि ५०० कोटी रुपयांच्या प्रकल्पांचे भूमिपूजन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी वाईचे आमदार मकरंद पाटील उपस्थित होते.
या भागातील विकासकामांबाबत बोलताना अजित पवार म्हणाले की, कृष्णा नदीवर १५ कोटी रुपयांच्या निधीची या भागाच्या वारशात भर घालणारा पूल बांधण्यात आला आहे. प्रदूषण, डासांची समस्या आदींवर तोडगा काढण्यासाठी या भागात एसटीपी (सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प) उभारण्यात आला आहे. सावित्रीबाई फुले स्मारकासाठी सरकारने १०० कोटी रुपयांची तरतूद केली आहे.
धर्मनिरपेक्ष विचारसरणी आणि घटनात्मक मूल्यांवरील विश्वासाचा पुनरुच्चार करताना अजित पवार म्हणाले की, राष्ट्रवादी काँग्रेस प्रत्येक समाजासाठी काम करेल. आम्ही विविध समुदायांसाठी महामंडळे स्थापन केली आहेत.
महायुती सरकारची महत्त्वाकांक्षी योजना माझी लाडकी बहिण योजनेबाबत बोलताना अजित पवार म्हणाले की, “आम्ही या योजनेचा लाभ 2 कोटी 22 लाख 12 हजार 729 महिलांना हस्तांतरित केला आहे”. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर अनेक नेते पक्षांतर करत आहेत, विरोधकांवर निशाणा साधत ते म्हणाले की, “लोक पक्ष बदलत आहेत, आमच्यासोबत 40 आमदार आहेत, पण आमच्या विरोधकांकडे 40 आमदार नाहीत, म्हणून ते इतर पक्षातील लोकांना घेत आहेत.”
यावेळी बोलताना आमदार मकरंद पाटील यांनी महाबळेश्वरसाठी १०० कोटी, प्रतापगडसाठी १२१ कोटी आणि काँक्रिटरस्त्यांसाठी ३०० कोटी रुपयांचा विकास निधी दिल्याबद्दल अजित पवार यांचे आभार मानले. आगामी विधानसभा निवडणुकीत मतदारांनी आपल्याला व पक्षाला पाठिंबा द्यावा, असे आवाहन त्यांनी केले.
बिग बॉस मराठी जिंकल्याबद्दल अजित पवार यांनी सूरज चव्हाण यांचे अभिनंदन केले. नेपाळ येथे झालेल्या आशिया रग्बी सेव्हन साइट करंडक स्पर्धेत रौप्यपदक पटकावणाऱ्या साताऱ्याच्या साक्षी नितीन जांभळे हिचेही त्यांनी अभिनंदन केले.
आगामी विधानसभा निवडणुकीत मतदारांनी महायुतीला पाठिंबा द्यावा, असे आवाहन अजित पवार यांनी यावेळी केले.