मुंबईत अजितदादांचा जिल्हास्तरीय बैठकांचा धडाका;सुनील तटकरे म्हणाले — ‘संघटन बळकट, विजय निश्चित.

मुंबई, दि ३
- राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज मुंबईत पक्षाच्या जिल्हा व तालुका समित्यांसोबत सलग मॅरेथॉन बैठकांचा धडाका लावला. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर संघटन मजबूत करण्यासाठी आणि पक्ष कार्याला वेग देण्यासाठी या बैठका आयोजित करण्यात आल्या.
या बैठकीदरम्यान विद्यमान संघटन रचना, स्थानिक आव्हाने, तसेच नेतृत्वातील समन्वय या मुद्यांवर सविस्तर चर्चा झाली. पक्षाच्या धोरणात्मक तयारीचा आणि आगामी निवडणुकांसाठी तयार करण्यात आलेल्या आराखड्याचा आढावा घेण्यात आला.
प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी पदाधिकाऱ्यांना उद्देशून सांगितले, “स्थानिक नेतृत्वाला सर्वेक्षण अहवाल, प्रचार पथके आणि आवश्यक संसाधनांच्या माध्यमातून पूर्ण पाठिंबा दिला जाईल. आपले लक्ष्य आहे – प्रत्येक जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसचा विजय सुनिश्चित करणे.”
तटकरे पुढे म्हणाले की, या बैठकांचा हेतू केवळ आढावा नव्हे, तर पक्षातील संवाद, समन्वय आणि संघटनात्मक बळ वाढवणे हा आहे. स्थानिक पातळीवरील प्रश्नांना तातडीने दखल देत प्रभावी उपाय शोधणे आणि कार्यकर्त्यांना नवचैतन्य देणे हा या बैठकींचा मुख्य उद्देश असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
या बैठकींना धनंजय मुंडे, नरहरी झिरवळ, रुपाली चाकणकर आणि संजय खोडके यांसारखे वरिष्ठ नेते उपस्थित होते. सर्व समित्यांच्या कामाचा आढावा घेऊन पक्ष अधिक सशक्त, संघटित आणि परिणामकारक करण्यासाठी पुढील रणनिती ठरवण्यात आली.



