बोरी येथील युवकाला २० वर्षाची सश्रम कारावासाची शिक्षा.
इंदापूर येथील जिल्हा सत्र न्यायालयाने सुनावली शिक्षा.

इंदापूर,दि.६
- इंदापूर जिल्हा सत्र न्यायालयाने ऐतिहासिक निर्णय दिला असून अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी इंदापूर तालुक्यातील बोरी येथील प्रशांत दादा शेंडे या व्यक्तीला तब्बल २० वर्षाचा सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली आहे.
२६/१०/२०१४ रोजी इंदापूर तालुक्यातील बोरी येथे एका अल्पवयीन मुलीला आरोपी प्रशांत दादा शेंडगे या व्यक्तीने जबरदस्ती करून आपल्या मोटर सायकल वरती नेऊन अपहरण केले होते. अपहरण केल्यानंतर सदर व्यक्तीने पीडित अल्पवयीन मुलीवरती वेगवेगळ्या ठिकाणी लैंगिक अत्याचार केला होता. त्यानंतर संबंधित मुलीच्या मामाने वालचंदनगर पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल केला होता.
संबंधित गुन्ह्याचा तपास वालचंदनगर पोलीस स्टेशनचे तत्कालीन पोलीस उपनिरीक्षक एस वाय क्षीरसागर यांनी केला होता. त्या तपासामध्ये संबंधित आरोपी प्रशांत दादा शेंडगे याने गुन्हा केल्याचे निष्पन्न झाले होते. त्या अनुषंगाने आरोपीविरुद्ध सत्र न्यायालयामध्ये बाललैंगिक अत्याचार कलमाप्रमाणे दोषारोपत्र दाखल करण्यात आले होते.सदरचा खटला सुरुवातीला बारामती येथील सत्र न्यायालयामध्ये सुरू होता. मात्र इंदापूर येथे जिल्हा सत्र न्यायालय सुरू झाल्यानंतर तो इंदापूर येथे वर्ग करण्यात आला. त्यामध्ये सुनावणी होऊन सरकारी पक्षाकडून ८ साक्षीदार तपासण्यात आले. या प्रकरणात सरकारतर्फे विशेष सरकारी वकील प्रसन्न जोशी यांनी काम पाहिले.
सदर प्रकरणांमध्ये पिडितेची साक्ष, वैद्यकीय अधिकाऱ्यांची साक्ष, तपासणी अधिकारी यांचा पुरावा, न्याय वैद्यकीय अहवाल व वैद्यकीय अहवालाप्रमाणे संबंधित पिडीतेवर अत्याचार झाल्याचे निष्पन्न झाले होते. सरकारी वकील प्रसन्न जोशी यांनी केलेला युक्तिवाद व न्यायला समोर मांडलेला सक्षम पुरावा महत्त्वाचा ठरला.
इंदापूर जिल्हा सत्र न्यायालयाचे न्यायाधीश यू एम मुधोळकर यांनी आरोपीस बाललैंगिक अत्याचार कलम ४,६,८ व ३६६,३७६(अ) प्रमाणे २० वर्ष सक्त मजुरीची शिक्षा व ५० हजार रुपयांचा दंड तसेच दंड न भरल्यास १ वर्ष सक्त मजुरीची शिक्षा, तसेच भा.द.वि.क ३६३ प्रमाणे ३ वर्ष सक्त मजुरीची शिक्षा व २५ हजार रुपये दंड, दंड न भरल्यास ३ महिने सक्त मजुरी शिक्षा तसेच भा.द.वि.क ३६६ प्रमाणे पाच वर्षे सक्त मजुरीची शिक्षा व २५ हजार रुपये दंड व दंड न भरल्यास ३ महिने सक्त मजुरीची शिक्षा सुनावली आहे.तसेच दंडाची रक्कम पिढीतेला तिच्या वैद्यकीय उपचारासाठी व तिच्या पुनर्वसनासाठी देण्याचे आदेश इंदापूर जिल्हा सत्र न्यायालयाने दिले आहेत.



