माणुसकीचा खरा उत्सव दिवाळीचा प्रकाश, श्रावण बाळ अनाथ आश्रमातील बालकांसोबत!

इंदापूर,दि.२३
- दिवाळी म्हणजे प्रकाशाचा, आनंदाचा आणि उत्साहाचा सण. मात्र या प्रकाशसोहळ्याचा खरा अर्थ तेव्हाच पूर्णत्वाला जातो, जेव्हा तो समाजातील वंचित, निराधार आणि उपेक्षित घटकांपर्यंत पोहोचतो. अशाच भावनेने इंदापूर शहरातील श्रावण बाळ आश्रमातील बालकांसोबत दिवाळी साजरी करण्यात आली आणि या निमित्ताने “माणुसकीचा खरा दीप” प्रज्वलित झाला.
या उपक्रमाचे आयोजन राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरदचंद्र पवार यांच्या प्रेरणेने तसेच तालुक्याचे कार्याध्यक्ष महारूद्र पाटील यांच्या पुढाकाराने करण्यात आले. या वेळी शहराध्यक्ष अँड. इनायतअली काझी, तालुका महिला अध्यक्षा छाया पळसकर, राजीव ढोरे, गणेश देवकर, अमोल मुळे, आप्पासाहेब गायकवाड, विकास खिलारे, अक्षय कोकाटे, केशव भापकर, दादा ढोरे, भारत जगताप आदी मान्यवर उपस्थित होते.
या प्रसंगी मुलांना फळे, मिठाई व विविध वस्तूंचे वाटप करून आनंदाचा वर्षाव करण्यात आला. निरागस चेहऱ्यांवर उमटलेले हसू पाहून उपस्थितांच्या डोळ्यांतही आनंदाश्रू दाटले.या कार्यक्रमादरम्यान बोलताना महारूद्र पाटील म्हणाले “श्रावण बाळ आश्रमातील बालकांसोबत दिवाळी साजरी करणं म्हणजेच माणुसकीचा खरा उत्सव आहे.
समाजातील दुर्लक्षित घटकांपर्यंत आनंद पोहोचवण्यातच खरी दिवाळी दडलेली आहे.ही भावना फक्त शब्दात नव्हे, तर कृतीत उतरली. समाजातील वंचित घटकांप्रती संवेदनशीलता, आपुलकी आणि प्रेम यांचे जिवंत उदाहरण या उपक्रमातून घडले.
आजच्या वेगवान, स्वार्थी जीवनात अशा कृती समाजाला नवी दिशा दाखवतात की दिवे फक्त घराच्या नव्हे, तर मनाच्या अंधारातही लावले पाहिजेत. कारण खरी दिवाळी तीच,जिथे प्रकाश माणुसकीचा असतो.



