ओबीसी नेते छगन भुजबळ भाजपमध्ये प्रवेश करतील..?
इंदापूर,दि.१८
- राज्यामध्ये सध्या महायुती सरकार सत्तेत आले असून या सरकारमधील भाजप, राष्ट्रवादी, शिवसेना मधील आमदारांनी मंत्रीपदाची शपथ घेतली आहे. त्यातच अजित पवार यांच्या पक्षातील ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांना मंत्रीपदापासून दूर ठेवल्याची चर्चा सुरू झाली असून भुजबळ यांच्या समर्थकांकडून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. मात्र हा राजकीय डाव अजित पवार व भाजप नेतृत्वाने आखला असून संपूर्ण राज्यसह देशभरात ओबीसीचे नेतृत्व करणारे ओबीसी नेते म्हणून छगन भुजबळ यांना भाजपमध्ये घेतले जाणार असून ते भाजपमध्ये प्रवेश करणार का अशी चर्चा सुरू आहे.
राज्यामध्ये सध्या छगन भुजबळ नाराज असल्याचे चित्र सत्ताधारी महायुतीकडून निर्माण केले जात आहे. तसेच छगन भुजबळ यांचे कार्यकर्ते राज्यामध्ये ठिकठिकाणी तीव्र संताप व्यक्त करत आंदोलने करत आहेत. त्यातच छगन भुजबळ अधिक आक्रमक झाल्याचे सध्यातरी दिसून येत आहे. असे असले तरी या पाठीमागे अजित पवार व भाजप यांचा डाव असल्याचे बोलले जात आहे. कारण भुजबळ हे संपूर्ण देशात व राज्यात ओबीसी चे नेतृत्व करतात. राज्यामध्ये सध्या जे महायुतीचे सरकार आले आहे ते केवळ छगन भुजबळ यांनी संपूर्ण राज्य पिंजून काढल्याने केवळ ओबीसींच्या जीवावर हे सरकार आल्याचे राजकीय जाणकारांचे मत आहे.
त्यातच राज्यात मराठा समाजाच्या आरक्षणाचा विषय गेली अनेक वर्ष चालू आहे. गेल्यावेळी मनोज जरांगे यांनी मराठा समाजासाठी ज्या ज्या वेळी आंदोलने व उपोषणे पुकारली त्या त्यावेळी तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ती आंदोलने व उपोषणे व्यवस्थित हाताळली. त्यावेळी एकनाथ शिंदे यांच्या नावाची चर्चा संपूर्ण राज्यासह देशभरात सुरू झाली. एक मराठा मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांना जरांगे यांनी प्रत्येक वेळी चांगला प्रतिसाद दिला. या सर्व गोष्टी तत्कालीन माहायुती मधील इतर नेत्यांना खटकत होत्या. त्यामुळे एकनाथ शिंदे यांना बाजूला करून त्यांच्या जागी अजित पवार यांना पुढे करत एकनाथ शिंदे यांचे मराठा कार्ड संपवण्याचा प्रयत्न होणार असल्याची चर्चा सध्या राजकीय विश्लेषकांमध्ये सुरू आहे.
अजित पवार यांना छगन भुजबळ यांच्यामुळे मराठा नेता म्हणून पुढे येताना अडचण निर्माण होत होती. जर छगन भुजबळ भाजपमध्ये गेल्यास अजित पवार यांना यापुढे मराठा नेता म्हणून एकनाथ शिंदे एकनाथ शिंदे यांचे स्थान घेता येईल. तसेच छगन भुजबळ यांना भाजपच्या कोट्यातून राज्याच्या मंत्रिमंडळात संधी दिली जाईल. तसे झाल्यास छगन भुजबळ यांच्या माध्यमातून भाजप संपूर्ण राज्यात ओबीसी कार्ड यापुढे खेळत प्रत्येक निवडणुकीत ओबीसींच्या मतावर राज्यांमध्ये सत्ता काबीज करण्याचा प्रयत्न केला जाईल.
परंतु सध्या राज्यामध्ये छगन भुजबळ यांच्या बद्दल जे सर्व काही सुरू आहे ते सर्व ठरवून सुरू असल्याची चर्चा चालू आहे. अजित पवार यांनाच भुजबळ यांना भाजपमध्ये पाठवायचे आहे. छगन भुजबळ जर भाजपमध्ये गेल्यास त्यांच्या पाठीमागे यापूर्वी लागलेला चौकशीचा फेरा व इतर अडचणी दूर होऊन मंत्रिमंडळात संधी मिळत ओबीसी चेहरा म्हणून पुढे आणण्याचा प्रयत्न महायुती मधीलच काही नेत्यांच्या पूर्व नियोजनानुसार सुरू आहे. त्यामुळे जे चालू आहे ते सर्व पूर्वनियोजित ठरलेला राजकीय कार्यक्रम सुरू असल्याचे चर्चा सध्या दिसत आहे.