९ सप्टेंबरला हर्षवर्धन पाटील पुन्हा घेणार तो निर्णय.?
हर्षवर्धन पाटील यांच्या निर्णयाचे राज्यभर उमटणार राजकीय पडसाद.
इंदापूर,दि.२
- राज्यामध्ये सध्या इंदापूर विधानसभा मतदारसंघ व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांची भूमिका व सुरू असलेली राजकीय चर्चा राज्याच्या राजकारणातील भूकंपाचा विषय बनला आहे. हर्षवर्धन पाटील यांनी मागील ९ सप्टेंबर २०१९ मध्ये काँग्रेस पक्षाला रामराम करत भाजपमध्ये प्रवेश केला होता. या पक्षप्रवेशाला येणाऱ्या ९ सप्टेंबर २०२४ मध्ये पाच वर्षे पूर्ण होत असून या तारखेला हर्षवर्धन पाटील पुन्हा तो धाडसी निर्णय घेणार असल्याची चर्चा राज्याच्या राजकारणात सुरू झाली आहे.
२०१९ मध्ये काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षाची आघाडी होती. त्या काळात राज्यात माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, बाळासाहेब थोरात, अशोकराव चव्हाण व राधाकृष्ण विखे-पाटील हे काँग्रेस पक्षाचे प्रमुख चेहरे होते. त्याचवेळी इंदापूर विधानसभा मतदारसंघात अजित पवार समर्थक दत्तात्रय भरणे हे आमदार होते. २०१९ च्या विधानसभा निवडणुकी वेळी इंदापूर विधानसभेची जागा काँग्रेस पक्षाला सोडण्यासाठी हर्षवर्धन पाटील यांनी पक्षश्रेष्ठ व राष्ट्रवादीच्या आग्रहाची मागणी केली होती.
मात्र,२०१९ मध्ये लोकसभेच्या निवडणुकीत हर्षवर्धन पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवाराचे प्रामाणिकपणे काम केले त्या बदल्यात विधानसभेचे च्या जागेचे आश्वासन दिले होते. मात्र, हे आश्वासन लोकसभेनंतर राष्ट्रवादी काँग्रेस विशेष करून अजित पवार यांनी पाळले नाही. तसेच आघाडीमध्ये सीटिंग आमदार म्हणून इंदापूर ची जागा अजित पवार यांच्या पक्षाला गेल्याने हर्षवर्धन पाटील यांनी बंडाचा झेंडा उभारत भाजपमध्ये प्रवेश केला होता.
भाजपमध्ये प्रवेश दिल्यानंतर हर्षवर्धन पाटील यांना लवकरच मोठी संधी मिळेल अशी कार्यकर्त्यांसह राजकीय वर्तुळात चर्चा होती. मात्र,भाजप ने त्यांना कोणतीही संधी दिली नाही. विधान परिषद व राज्यसभेच्या जागेवर वेळोवेळी चर्चा होऊनही त्यांना संधी दिली नाही. विशेष म्हणजे हर्षवर्धन पाटील यांच्या अनुभवाचा फायदा भाजप पक्षासह,पक्ष नेतृत्वाला घेता आला नाही. हर्षवर्धन पाटील यांनी काँग्रेसमध्ये असताना आघाडी सरकारमध्ये अनेक वर्ष सहकार व संसदीय मंत्री पदा सह अनेक खाती संभाळली होती. विशेष म्हणजे राज्याच्या अर्धा डझन मुख्यमंत्र्यांसोबत काम करण्याचा असलेला त्यांचा दांडगा अनुभव व सहकार क्षेत्रात असलेली पकड पाहता भाजप त्यांना व त्यांच्या अनुभवाला न्याय देऊ शकले नाही असे आजही विविध पक्षातील नेते व राजकीय विश्लेषक यांचे मत आहे.
मात्र,त्यानंतर राज्यात महायुतीचे सरकार आले. या दोन इंजिन असलेल्या सरकारमध्ये अजित पवार यांचे तिसरे इंजिन सहभागी झाले. अजित पवार यांचा पक्ष सत्तेत सहभागी झाल्याने पुन्हा इंदापूर विधानसभेचा वाद उफाळून आला आहे.विशेष म्हणजे नुकत्याच झालेल्या बारामती लोकसभेच्या निवडणुकीत अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांचा हर्षवर्धन पाटील यांनी प्रामाणिकपणे प्रचार केला. त्या अगोदर हर्षवर्धन पाटील, देवेंद्र फडणवीस व अजित पवार यांची मुंबईमध्ये सागर बंगल्यात बैठक झाली होती त्यावेळी अजित पवार यांनी हर्षवर्धन पाटील यांना इंदापूर विधानसभेच्या जागेचा शब्द दिल्याची माहिती मीडियामध्ये प्रसिद्ध झाली होती.
तसेच स्वतः अजित पवार यांनी इंदापूर मध्ये येऊन आमचं ठरलं आहे असं कार्यकर्त्यांना संबोधित केलं होतं. मात्र तो शब्द अजित पवार यांनी दोनच महिन्यात फिरवल्याने व भाजपच्या पक्ष नेतृत्वाने हर्षवर्धन पाटील तसेच इंदापूर विधानसभेची दखल न घेतल्यामुळे हर्षवर्धन पाटील हे पुन्हा भाजपला रामराम ठोकत वेगळा पर्याय निवडणार असल्याची चर्चा असून ते ९ सप्टेंबर २०२४ मध्ये धाडसी निर्णय घेणार असल्याचे राजकीय जाणकारांचे मत आहे.