इंदापूर,दि.४
- आज इंदापूर मध्ये पंचायत समितीमध्ये कार्यरत असणारे फरार आरोपी ग्रामसेवक निलकंठ दत्तात्रय गिरी यांना इंदापूर पोलिसांनी तब्बल चार वर्षानंतर अटक केली आहे. सदरचा ग्रामसेवक गेली चार वर्ष ॲट्रॉसिटी व ३०७ मध्ये फरार आरोपी होता. अखेर या फरार असणाऱ्या आरोपीस बेड्या ठोकण्यात इंदापूर पोलिसांना यश आले असून इंदापूर पोलिसांनी केलेल्या कारवाईचे कौतुक केले जात आहेत.
दि.२२/०२/२०२० मध्ये इंदापूर तालुक्यातील बेडशिंग येथील दलित कुटुंबातील एका ३० वर्षीय तरुणाला बेदम मारहाण करण्यात आली होती. त्यामध्ये सदरचा तरुण गंभीर स्वरूपात जखमी झाला होता. त्याकाळी एका खाजगी रुग्णालयात त्याच्यावरती उपचार करण्यात आले. सदरच्या दलित कुटुंबातील तरुणाला सध्या इंदापूर तालुक्यात कार्यरत असणाऱ्या एका ग्रामसेवकासह त्या गुन्ह्यातील बहुतांश आरोपींनी मारहाण केली होती. त्याचवेळी सदर ग्रामसेवकावरती गुन्हा दाखल करण्यात आला होता. तेव्हापासून तो ग्रामसेवक फरार होता. सदर ग्रामसेवकाचे नाव निलकंठ दत्तात्रय गिरी असून गाव बेडशिंग आहे.
मात्र दि.१२/०७/२०२४ रोजी तक्रारदार शिवाजी बबन मिसाळ यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह गृहमंत्री देवेंद्र फडणीस व पोलीस महासंचालक यांना निवेदन देत सदरचा आरोपी हा इंदापूर तालुक्यात शासकीय सेवेत कार्यरत असताना त्याला फरार असल्याचे दाखवले आहे. त्यामुळे सदर आरोपीला तात्काळ अटक करण्यात यावी अशी मागणी केली होती. सदरच्या आरोपीला राजकीय पाठबळ असल्याने त्या दबावापोटी सदर गंभीर गुन्हात फरार असलेल्या आरोपीस अटक केली जात नाही. परंतु सदर आरोपीला देशाच्या स्वातंत्र्यदिना पर्यंत म्हणजेच १५ ऑगस्टपर्यंत अटक न झाल्यास संपूर्ण कुटुंबासह इंदापूर पोलीस स्टेशन समोर आत्मदहन करण्याचा इशारा दिला होता.
या इशाऱ्यानंतर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच पोलीस महासंचालक महाराष्ट्र राज्य यांनी सदर तक्रारीची दखल घेत तात्काळ कारवाईचे आदेश दिले. त्यानुसार इंदापूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सूर्यकांत कोकणे व त्यांच्या टीमने सदर फरार असलेल्या ग्रामसेवक आरोपीस निलकंठ दत्तात्रय गिरी यांना बेड्या ठोकल्या आहेत. विशेष म्हणजे चार वर्ष गुंगारा देणारा ग्रामसेवक आरोपीस इंदापूर पोलिसांनी मोठी शिताफीने ताब्यात घेतले आहे.